नवी दिल्ली/कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर हंगामासाठी उसाची एफआरपी प्रतिटन २७५० रुपये कायम ठेवला आहे. साखरेचा बफरस्टॉक ४० लाख टन करण्याचा निर्णयही घेतला आहे.
अतिरिक्त साखर उत्पादनामुळे साखरेला दर नाही. परिणामी, चालू हंगामातील ऊस बिलांची १५ हजार कोटी रुपये साखर कारखान्यांकडे थकबाकी आहे. ही देणी देता यावीत तसेच साखरेचे दर स्थिर होऊन मागणी-पुरवठ्याचे संतुलन साधले जावे यासाठी बफरस्टॉक ३० लाख टनांवरून ४० लाख टन करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत बुधवारी घेतला. त्यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर १६७४ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
गतवर्षीपेक्षा १० लाख टन जादा साखरेचा बफरस्टॉक करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. हा बफर स्टॉक १ ऑगस्ट २०१९ ते ३१ जुलै २०२० या कालावधीसाठी असेल.
इतर पिकांची आधारभूत किंमत वाढत असताना उसाची आधारभूत किंमत का वाढविली गेली नाही? हा कृषीमूल्य आयोग आहे की केंद्राचा अॅडजेस्टमेंट आयोग आहे. - राजू शेट्टी, माजी खासदार