नवी दिल्ली : नवीन महाराष्ट्र सदनाचे वेध देशातील महात्वाच्या पक्षातील सर्वच दिग्गज नेत्यांना लागले आहे. ‘सबकी पसंद, महाराष्ट्र सदन’ असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. आज कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनीही नवीन महाराष्ट्र सदनाच्या बॅक्वेट हॉलमध्ये पत्रकार परिषद घेतली.माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नवीन महाराष्ट्र सदनाचे उद्घाटन केले. त्यांनतर महाराष्ट्र सदन घोटाळ्यामुळे चर्चेत आले आणि यातच तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ हे तुरुंगात गेले. वादग्रस्त महाराष्ट्र सदनाला मात्र गेल्या दोन वर्षात सुगीचे दिवस आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीनवेळा या सदनात येऊन गेले. भाजपचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा हे तर नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रेमातच पडले आहेत. पक्षाच्या महत्वाच्या बैठकाही ते इथेच आयोजित करीत असतात. वेळप्रसंगी ते मुख्यमंत्र्यांचे भव्य दालन वापरतात. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे सुध्दा एका कार्यक्रमाला इथे येऊन गेले आहेत. नितीन गडकरी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन याच सदनात झाले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आदींनी वेळोवेळी या सदनात आयोजित कार्यक्रमास हजेरी लावली.
दोन वर्षात सुगीचे दिवस, सबकी पसंद महाराष्ट्र सदन!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2018 1:17 AM