नवी दिल्ली : सुरक्षा संस्थांनी राजधानी दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तविली असून, दिल्ली पोलिसांना याबाबत सतर्क केले आहे.जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरच्या सांबा येथे लष्करी छावणीवर ज्या पद्धतीने आत्मघाती हल्ला केला होता तशाच प्रकारे येथेही हल्ला करण्याचा कट या संघटनेने आखला आहे. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय सुरक्षा संस्थांनी सतर्कतेचा इशारा दिला. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रामुख्याने पोलीस उपायुक्तांना आपापल्या अधिकार क्षेत्रातील परिसराच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या २१ मार्चला दोन आत्मघाती दहशतवाद्यांनी सांबामध्ये जम्मू- पठाणकोट महामार्गावरील एका लष्करी छावणीवर हल्ला केला होता. अर्थात सुरक्षा जवानांनी या दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करून हा हल्ला उधळून लावला होता. याच गटाच्या दोन दहशतवाद्यांनी २० मार्चला जम्मूच्या कठुआ जिल्ह्णात एका पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले होते. यात दोन नागरिकांचा मृत्यू आणि एका पोलीस उपअधीक्षकासह ११ जण जखमी झाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
दिल्लीत आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता
By admin | Published: April 06, 2015 1:07 AM