ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - चलनातून रद्द केलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी दोन वयोवृद्ध महिला तीन दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये चकरा मारत आहेत. मात्र त्याचं काम काही केल्या होत नाही. या दोघी मायलेकी आहेत.
यातील मुलगी उषाचं वय 65 वर्षे असून आई सुमित्रा जवळपास 80 वर्षांची आहे. लागोपाठ तीन दिवस जुन्या नोटा बदलण्यासाठी आरबीआयच्या रांगेत सुमित्रा उभ्या राहत आहेत. मात्र नोटा बदलून मिळत नसल्याने दोघीही हैराण झाल्या आहेत.
एका कापडात त्यांना जुन्या नोटा असलेली जवळपास 41, 500 रुपयांची रक्कम मिळाली. त्यात रद्द करण्यात आलेल्या नोटा बदलण्याची शुक्रवारपर्यंतच (31 मार्च)मुदत आहे. यामुळे या मायलेकींची काळजी आणखी वाढली आहे.
बँकेतील एका अधिका-याने सांगितले की येथे केवळ एनआरआय लोकांनाच नोटा बदलून मिळणार, असा आरोप या दोघींनी केला आहे. कुणाकडूनही मदत मिळत नसल्याने वैतागून या दोघींनी डीसीपीला पत्र लिहून आत्महत्या करण्याची अखेर धमकी दिली.
काळा पैसा आणि बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. यानंतर प्रत्येक शहरवासियांना तेथील स्थानिक बँकेत 31 डिसेंबरपर्यंत आपल्याजवळील जुन्या नोटा जमा करण्याची मुभा दिली. जे 31 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा जमा करू शकले नाहीत त्यांना 31 मार्चपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोटा जमा करण्यासाठी 31 मार्च मुदत वाढवून देण्यात आली. याच पार्श्वभूमीवर, मुदतीचा केवळ एक दिवस राहिल्यानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाबाहेर चलनातून रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या बदलण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.