ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - दारु पिऊन गाडी चालवणारे आत्मघाती हल्लेखोरापेक्षा कमी नाहीत असं मत सत्र न्यायालयाने व्यक्त केलं आहे. ड्रिंक अॅण्ड ड्राईव्ह प्रकरणी सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे मत व्यक्त केलं आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने दारु पिऊन गाडी चालवणा-याला सुनावण्यात आलेली पाच दिवसांची कारावासाची शिक्षा रद्द करण्यास नकार दिला.
"दारु पिऊन गाडी चालवणे निर्धारित गुन्हा नसला तरी सामाजिक धोक आहे. दारु पिऊन गाडी चालवणारी व्यक्ती फक्त आपलाच जीव धोक्यात घालत नाही, तर रस्त्यावरुन जाणा-या इतरांचाही जीव धोक्यात घालते. अशावेळी अपघात झाल्यास रस्त्यावरुन जाणा-या निरपराध लोकांना, कुंटुंबाला तसंच चालकाच्या कुटुंबाला याचे परिणाम भोगावे लागतात. रस्त्यावर अशाप्रकारे वाहन चालवणारे एखाद्या मानवी बॉम्बपेक्षा कमी नाहीत", असं सत्र न्यायालयाने म्हटलं आहे.
"ड्रिंक अॅण्ड ड्राईव्हमुळे होणा-या परिणामांकडे न्यायालय दुर्लक्ष करु शकत नाही. दारु पिऊन गाडी चालवणारा कोणाचा तरी जीव घेऊ शकतो किंवा स्वत:चा जीव गमावू शकतो. ड्रिंक अॅण्ड ड्राईव्हमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर अनेकांना अपंगत्व आलं", असं यावेळी न्यायालयाने सांगितलं.
सचिन कुमार नावाच्या व्यक्तीला ड्रिंक अॅण्ड ड्राईव्हच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. 24 मार्च रोजी त्याला ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह प्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याच्या शरिरात अलकोहोचं प्रमाण सर्वात जास्त आढळलं होतं. न्यायालयाने त्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याला साडे तीन हजारांचा दंडही ठोठावण्यात आला होता. यानंतर सचिनने आपल्या सुटकेसाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. त्याचा अर्ज फेटाळताना न्यायालयाने हे मत मांडलं आहे.