दिल्लीच्या अक्षरधाम मेट्रो स्टेशनवर एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर चढून एका तरुणीनं उडी मारल्याचा प्रकार घडला. पण सीआयएसएफ आणि पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे संबंधित तरुणीची जाव वाचला आहे.
दिल्लीच्या अक्षरधाम मेट्रो स्थानकात आज सकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी खळबळ उडाली. एक तरुणी मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर चढल्याचं एका सीआयएसएफ जवानानं पाहिलं. तरुणी भिंतीवरुन उडी मारण्याचा प्रयत्न करत होती. सीआयएसएफ जवानानं जेव्हा संबंधित तरुणीला पाहिलं तेव्हा त्याच्याही पाया खालची वाळू सरकली होती. घटनास्थळावर उपस्थित तरुणांनी तिला समजवण्याचा प्रयत्न सुरू केला आणि तिला भिंतीवरुन खाली उतरण्याचं आवाहन केलं. पण तरुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
तरुणीला बोलण्यात गुंगवून सीआयएसएफ जवानांनी भिंती खाली एक चादर घेऊन तिला वाचविण्यासाठीची तयारी सुरू केली. तरुणीनं भिंतीवरुन उडी घेतली आणि सीआयएसएफ जवानांनी तिला चादरीच्या सहाय्यानं झेललं. दुसरीकडे स्थानिक पोलिसांनी अॅम्ब्यूलन्सला पाचारण केलं. त्यानंतर संबंधित तरुणीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
तरुणीच्या पायाला दुखापत झाली आहे. पण कोणत्याही प्रकारचा रक्तस्राव झालेला नाही. तरुणीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.