पाटणा : राज्य सरकारद्वारे अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीची भरपाई देण्याची मागणी करीत एका शेतकऱ्याने शुक्रवारी केंद्रीय राज्यमंत्री रामकृपाल यादव यांच्यासमोरच आत्महत्येचा प्रयत्न केला.पाटणा जिल्ह्णातील बिहटा येथे ही घटना घडली. बिहार सरकारने इंडस्ट्रीयल पार्कसाठी अधिग्रहित केलेल्या आपल्या जमिनीचा मोबदला मिळावा, या मागणीसाठी बिहटा येथील शेतकऱ्यांचे गेल्या सहा दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि पेयजल राज्यमंत्री रामकृपाल यादव हे या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. यादव हे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत बोलत असताना एका शेतकऱ्याने अचानक बाजूच्या झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.‘शेतकरी आत्महत्या करण्याच्या इराद्याने झाडावर चढल्यानंतर लोक ओरडले. त्यांचा आरडाओरडा ऐकून मी झाडाखाली गेलो आणि शेतकऱ्याला खाली उतरण्याची विनंती केली. काही वेळानंतर तो झाडावरून खाली उतरला,’ असे रामकृपाल यादव यांनी सांगितले.या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला देण्याबाबत आपण पाटणाचे जिल्हा दंडाधिकारी अभयकुमार सिंग यांच्याशी फोनवर बोललो, असेही यादव म्हणाले. दरम्यान पीडित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला ताबडतोब दिला जाईल, असे आश्वासन यादव यांनी दिल्याची माहिती अभयकुमार सिंग यांनी दिली. आठ वर्षांपूर्वी इंडस्ट्रीय पार्कसाठी या शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)
मंत्र्यासमोर आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: May 16, 2015 2:14 AM