ग्वालियर - मध्य प्रदेशमधील एका युवकाने डान्सर बनण्याचं स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ग्वालियर येथील कँसर पर्वतरांगांमधील ही घटना आहे. मौनी बाबा मंदिराजवळ राहणारा 16 वर्षीय अज्जू हा 11 वीचा विद्यार्थी होता. त्याला डान्सर बनायचं होतं, पण कुटुंबीयांचा त्याच्या या छंदाला विरोध होता. त्यातूनच, दुखी होवून त्याने रविवारी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.
ग्वालियच्या परिसरातील रेल्वे पटरीवर पाहिल्यानंतर स्थानिकांनी झांसी रोड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, त्याठिकाणी सुसाईड नोटही आढळून आली आहे. त्यानंतर, पोलिसांनी संबंधित युवकाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. मृत युवकाने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात आपली अंतिम इच्छा बोलून दाखवली आहे. मरणानंतर प्रत्येकाची अंतिम इच्छा पूर्ण केली जाते. सरकारने माझीही अंतिम इच्छा पूर्ण करावी, मला सरकारवर विश्वास आहे. त्यामुळे, माझ्या मृत्यूनंतर माझ्यावर एक गाणं बनविण्यात यावं, हे गाणं देशातील सर्वात मोठे गायक अरजितसिंग यांनी गावं, असेही युवकाने म्हटले आहे.
नेपाळचे रहिवाशी असलेले माझे आवडते डान्सर सुशांत खत्रींनी या गाण्याची कोरिओग्राफी करावी, मी सरकारचा आभारी राहीन, तेव्हाच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. मी पंतप्रधानांनाही विनंती करतो की, त्यांनी माझी इच्छा पूर्ण करावी, असे मृत्यूपूर्वीच्या पत्रात अज्जूने लिहिले आहे.
आई-वडिलांची मागितली माफी
अज्जूने सुसाईड नोटमध्ये आई-वडिलांची माफी मागितली आहे. मी तुमचा चांगला मुलगा बनू शकलो नाही. मी खूप मतलबी आहे, जो कुटुंबाला सोडून जात आहे. मी एक चांगला डान्सर बनू इच्छित होतो, पण कुणीही मला सपोर्ट केला नाही. मी माझ्यासोबत अनेक गुपितं घेऊन जात आहे, असेही अज्जूने लिहिले आहे. दरम्यान, अज्जूला कुठलाही त्रास नव्हता, त्याने हे पाऊल का उचचले हे आम्हाला समजत नाही, असे त्याच्या घरच्यांनी म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.