ऑनलाइन लोकमत -
गुडगाव, दि. 16 - आंतरराष्ट्रीय कंपनी ब्रिटानिकाचे चीफ ऑपरेटींग ऑफिसर (सीओओ) विनीत व्हिग यांनी इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. 47 वर्षीय विनीत व्हिग सायबर सिटी परिसरतील डीएलएप फेज इमारतीत राहत होते. याच इमारतीच्या 19व्या मजल्यावरुन उडी मारुन त्यांनी रविवारी आत्हमत्या केली. पोलिसांना त्यांच्या खिशात सुसाईड नोट सापडली असून त्रस्त असल्यामुळे आत्महत्या करत असल्यांचं त्यांनी लिहिलं आहे.
विनीत व्हिग आपले वडिल, बायको, दोन मुलं आणि मुलीसोबत राहत होते. त्यांचा मुलगा सध्या 19 वर्षाचा असून कॉलेजमध्ये शिकत आहे. विनीत यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाला धक्का बसला आहे. विनीत यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांचे वडील ओम यांना ह्रद्यविकाराचा झटका बसला असून त्यांना रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे.
विनीत व्हिग यांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा छंद होता. त्यासाठी त्यांनी अनेक देशांमध्ये प्रवासदेखील केला होता. त्यांनी काढलेले फोटो नॅशनल जिओग्राफिक ट्रॅव्हलरमध्येदेखील आले होते.
सकाळी रस्त्यावर साफसफाई सुरु असताना कर्मचा-यांना विनीत यांचा मृतदेह दिसला. विनीत यांची चप्पल 19व्या मजल्यावर आढळल्याने पोलिसांना तेथूनच आत्महत्या केली असल्याची शंका आहे. आत्महत्या नेमकी कशी केली यासाठी पोलिस सीसीटीव्हीची तपासणी करत आहेत.
'मॉर्निग वॉकसाठी विनीत बाहेर पडले होते, यावेळी ते जास्त वेळ घालवतात त्यामुळे ते लवकर घरी आले नसतानादेखील कुटुंबियांना शंका आली नव्हती. सुरक्षारक्षकाने दिलेल्या माहितीनुसार विनीत यांनी याअगोदरही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची शंका आहे', अशी माहिती एसीपी सिंग यांनी दिली आहे.