नवी दिल्ली : देशात रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या आत्महत्या प्रकरणांमध्ये २०१९ साली २३.४ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, हे प्रमाण त्याच्या सहा वर्षांपूर्वीच्या आकडेवारीपेक्षा दुप्पट आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्यूरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीतून हे विदारक सत्य समोर आले आहे. २०१९ साली आत्महत्या केल्याचे १,३९,१२३ प्रकार घडले. त्यातील ३२,५६३ जण हे रोजंदारीवर काम करणारे व हातावर पोट असणारे मजूर होते. या आकडेवारीमध्ये आत्महत्या केलेल्या शेतमजुरांचा समावेश करण्यात आलेला नाही. रोजंदारीवर काम करणाºया मजुरांनी आत्महत्या केल्याच्या सर्वाधिक घटना तामिळनाडूमध्ये (५,१८६) घडल्या. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये (४,१२८), मध्य प्रदेश (३,९६४), तेलंगणा (२,८५८), केरळ (२,८०९) या राज्यांचा क्रमांक लागतो.
रोजंदारीवर काम करणाºया मजुरांच्या आत्महत्या प्रकरणांची नोंद एनसीआरबीच्या अहवालात अपघाती मृत्यू व आत्महत्या या गटामध्ये होण्यास २०१४ सालापासून सुरुवात झाली. त्यावर्षी आत्महत्या करणाऱ्यांमध्ये १२ टक्के लोक हे रोजंदारी मजूर होते. मात्र, हे प्रमाण पुढील सहा वर्षांत सातत्याने वाढत राहिले.
गृहिणी, शेतमजुरांच्या आत्महत्येचे प्रमाण झाले कमी
च्रोजंदारीवरील मजुरांनंतर सर्वाधिक आत्महत्या गेल्या वर्षी गृहिणींनी केल्या असून, त्या घटनांची संख्या २१,३५९ आहे. त्याचे प्रमाण १५.४ टक्के आहे. मात्र, गृहिणी व शेतमजुरांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीत शेतमजुरांची आकडेवारी स्वतंत्रपणे देण्यात आली आहे. गेल्या वर्षी देशभरात शेतमजुरांच्या आत्महत्या प्रकरणांची टक्केवारी फक्त ३.१ टक्के होती.
२०१४ साली १५,७३५ रोजंदारी मजुरांनी आत्महत्या केली होती. हे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक होऊन २०१९ साली ही संख्या ३२,५६३ झाली. एनसीआरबी अहवालामध्ये आत्महत्या करणाºयाचा व्यवसाय दिलेला असतो; पण आत्महत्येची कारणे विषद केलेली नसतात.