ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - दिल्लीच्या गीता कॉलनी येथील आराम पार्कमध्ये घरगुती भांडणामुळे पतीने गोळी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांनी आपल्या मुलांसमोर गोळी मारून आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या पत्नीचे एका पोलीस हवालदारासोबत प्रेमसंबंध होते असं वृत्त आहे. पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गीता कॉलनी येथील आराम पार्कमध्ये हसीन नावाचा एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहात होता. चार वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. त्याच्या पत्नीचे गीता कॉलनी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदारासोबत प्रेमसंबंध होते. त्या हवालदाराचं हसीनच्या घरी सातत्याने येणं-जाणं होतं. हसीनला याबाबत कुणकुण लागली होती. प्रदीपपासून दूर राहा असं त्याने आपल्या पत्नीला बजावलंही होतं.
मात्र, त्याने पत्नी आणि प्रदीपमध्ये व्हॉट्सअॅपवर झालेली चॅटिंग वाचली होती. हसीनच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार यासंबंधी तक्रार करण्यासाठी तो पत्नीला घेवून गीता कॉलनी पोलीस ठाण्यातही गेला होता. मात्र तेथे पोहोचल्यावर प्रदीपने त्यांना पोलीस स्थानकातून पळवून लावलं. या घटनेमुळे हसीन पुरता हादरला होता, आता आपली कोणीही मदत करू शकत नाही असा विचार करून त्याने बुधवारी पहाटे स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली.
कुटुंबियांनी त्याला रूग्णालयात दाखल केलं पण तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. याप्रकरणी पोलीस आता हवालदार प्रदीपवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.