नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलेला सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) सध्या तुरुंगात आहे. दरम्यान, तुरुंग प्रशासनाने सुकेशच्या सेलवर छापा टाकला. यावेळी तुरुंग अधिकाऱ्यांनी सुकेशच्या सेलमधून दीड लाख रुपये किमतीची गुच्ची चप्पल आणि 80 हजार रुपये किमतीच्या दोन जीन्स जप्त केल्या आहेत. या छाप्यादरम्यान सुकेश चंद्रशेखर तुरुंग अधिकाऱ्यांसमोर रडताना दिसला.
या छाप्याचा व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील तिहारमधील मंडोली तुरुंगातील असल्याचा दावा केला जात आहे. याठिकाणी तुरुंगातील सुरक्षा कर्मचारी सुकेशच्या सेलमध्ये तपासणी करताना दिसले. मिळालेल्या माहितीनुसार, तुरुंग अधिकाऱ्यांनी सुकेशच्या सेलमध्ये असलेल्या प्रत्येक वस्तूची तपासणी केली. यादरम्यान पोलीस अधिकारी दीपक शर्मा आणि जयसिंग त्याच्या सेलमध्ये पोहोचताच तो रडू लागला.
सुकेशने सरकारी अधिकारी बनून केली होती फसवणूक सरकारी अधिकारी बनून लोकांची 200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप सुकेशवर आहे. याचबरोबर, सुकेश चंद्रशेखरने वरिष्ठ न्यायाधीश म्हणून स्वत: सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीशांना फोन केले होते. सुकेशला फोनवरून दबाव निर्माण करून निर्णय आपल्या बाजूने लिहून घ्यायचा होता. त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचेही नाव सुकेशसोबत जोडले गेले.
या प्रकरणी जॅकलिनवरही आरोपसुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिनवरही आरोप केले होते. सुकेशने जॅकलिनला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने जॅकलिनला आरोपी बनवले आहे. दुसरीकडे जॅकलिन या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचा दावा करत आहे. जॅकलिनने सांगितले होते की, सुकेश तिला शूटिंगच्या आधी सकाळी फोन करायचा. त्यानंतर दुपारी एखदा कॉल आणि रात्री झोपण्यापूर्वी एक कॉल करत होता. दरम्यान, सुकेशने तो तुरुंगातून फोन करतोय किंवा तुरुंगात आहे, हे कधीच सांगितले नव्हते, असेही जॅकलिन म्हणाली होती. या दोघांमधील शेवटचे संभाषण 8 ऑगस्ट 2021 रोजी झाले होते.