नवी दिल्ली : ओडिशात झालेल्या रेल्वे अपघातानं अवघ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं. २९० नागरिकांना या भीषण अपघातात आपला जीव गमवावा लागला. या अपघातातील पीडितांच्या मदतीसाठी अनेकजण समोर येत आहेत. अशातच दिल्लीच्या मंडोली तुरुंगात बंद असलेला महाठग सुकेश चंद्रशेखर याने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून ओडिशा रेल्वे अपघातातील पीडितांसाठी १० कोटी रुपयांचे दान स्वीकारण्याची विनंती केली आहे.
२ जून रोजी झालेल्या अपघातात २९० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. शुक्रवारी लिहिलेल्या पत्रात सुकेशने म्हटले की, हे योगदान माझ्या वैयक्तिक निधीतून देत आहे, जे माझ्या कमाईच्या स्रोतातून आले आहे. १० कोटी रुपयांच्या डिमांड ड्राफ्टसोबत रिटर्न फायलिंग आणि इतर कागदपत्रेही दिली जातील. सुकेशने आपल्या वकिलामार्फत जारी केलेल्या पत्रात लिहिले, "हा एक दुर्दैवी अपघात असून त्यामुळे मी पूर्णपणे तुटलो आहे. मागील काही दिवसांपासून या घटनेने मी व्यथित आहे. या दुर्घटनेत ज्यांच्या जवळच्या व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत क्लेशदायक आहे."
सुकेशचे रेल्वेमंत्र्यांना आवाहन तसेच आपले सरकार सर्व बाधितांना सर्व आवश्यक गोष्टी पुरवत आहेच पण मी एक जबाबदार आणि चांगला नागरिक म्हणून ज्या कुटुंबांनी आपले कमावते प्रियजन गमावले आहेत. त्यांच्यासाठी आर्थिक मदत करू इच्छित आहे. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मी १० कोटी रुपयांचे योगदान देत आहे. हे योगदान केवळ मृत कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी वापरले जावे, असे सुकेशने पत्रात लिहले.
२९० जण दगावले२ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता बालासोर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला. या अपघातात २९० जणांचा मृत्यू झाला तर १२०० हून अधिक जण जखमी झाले होते. अवघ्या विश्वाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या रेल्वे अपघातात तब्बल २९० जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या दुर्देवी घटनेनंतर ३ जून रोजी ओडिशात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.