Sukesh Chandrashekhar Bail : 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी दिल्लीतील तिहार तुरुंगात असलेला महाठग सुकेश चंद्रशेखरला दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाने सुकेशला "दोन पाने" निवडणूक चिन्ह लाचखोरी प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. दिल्ली पोलिसांनी 2017 मध्ये हा गुन्हा दाखल केला होता. मात्र, जामीन मिळूनही सुकेश तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाही. याचे कारण म्हणजे, त्याच्यावर इतर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टाने शुक्रवारी(दि.30) सुकेश चंद्रशेखरला AIADMK च्या "दोन पाने" निवडणूक चिन्हाशी संबंधित लाचखोरी प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी सुकेशला 5 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन दिला आहे. मात्र, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पीएमएलए प्रकरणात आणि दिल्ली पोलिसांच्या मकोका प्रकरणात सुकेशला दिलासा मिळालेला नाही. त्यामुळेच सुकेश तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाही.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न सुकेश चंद्रशेखर याने AIADMK नेते टीटीव्ही दिनकरन यांच्यासाठी मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आणि व्हीके शशिकला यांच्या नेतृत्वाखालील गटासाठी पक्षाचे 'दोन पाने' निवडणूक चिन्ह सुरक्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
सुकेशच्या पत्नीच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू दरम्यान, सुकेशची पत्नी लीना मारिया हिच्या जामीन अर्जावरही काल दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली, पण दिल्ली पोलिसांनी जामीनाला विरोध केला. पोलिसांनी म्हटले की, सुकेशची पत्नी लीनाचे कुटुंबीय दुबईत राहतात, त्यामुळे ती दुबईला पळून जाऊ शकते. तिला जामीन मिळू नये. आता या प्रकरणाची सुनावणी 12 सप्टेंबरला होणार आहे. दिल्ली पोलिसांनी असेही सांगितले की, आरोपी लीनाचा गुन्हेगारी टोळीत सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिचा पती सुकेश चंद्रशेखर हा या टोळीचा सूत्रधार आणि म्होरक्या आहे. या पती-पत्नी दोघांनीही सरकारी अधिकारी असल्याचे दाखवून अनेकांची फसवणूक केली आहे.