तिहार जेलमध्ये असलेला महाठग सुकेश चंद्रशेखर याने पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक पत्र लिहिलं आहे. सुकेश चंद्रशेखरने अरविंद केजरीवाल यांच्यावर धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात सुकेशने आरोप केला आहे की, "गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्या कुटुंबीयांना एका मोबाईल नंबरवरून सतत कॉल करून धमकावलं जात आहे."
"जेलमध्ये सतेंद्र जैन आणि केजरीवाल यांच्या जवळचे अधिकारी आपल्याला धमकावत आहेत. मी घाबरत नाही, मी लवकरच सीबीआयसमोर तुम्हाला एक्सपोज करेन." अरविंद केजरीवाल जिथून निवडणूक लढवतील तिथे अपक्ष उमेदवार म्हणून त्यांच्या विरोधात उभं राहणार असा दावा सुकेशने केला. केजरीवाल यांनी तमिळनाडूतून लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देऊन आमिष दाखविल्याचा आरोपही त्याने केला आहे.
सुकेश चंद्रशेखर याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने केजरीवाल यांच्यावर अनेक आरोप केले होते. मे 2023 मध्ये त्याने दिल्लीच्या उपराज्यपालांना एक पत्र लिहून अरविंद केजरीवाल यांचे अधिकृत निवासस्थान सजवण्यासाठी केलेल्या खरेदीची चौकशी करण्याची मागणी केली होती. केजरीवाल यांच्या सरकारी घरासाठी महागडे फर्निचरसाठी पैसे दिल्याचा दावा सुकेशने केला होता.
फर्निचरशिवाय क्रॉकरीसाठीही पैसे दिल्याचं सांगितलं. 15 ताट आणि 20 चांदीचे ग्लास आणि काही मूर्ती खरेदी करून शासकीय निवासस्थानी पोहोचविण्यात आल्या. त्याने 45 लाख रुपयांचे ऑलिव्ह ग्रीन रंगाचे 12 सीटर डायनिंग टेबल, 34 लाख रुपयांचे बेडरूमचे ड्रेसिंग टेबल, सात आरसे, भिंतीवरील घड्याळ आणि इतर काही वस्तू खरेदी केल्या होत्या.