Sukesh Chandrashekhar: मनी लॉंड्रिंग प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर याने केलेल्या एका दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. सुकेश चंद्रशेखरने मंडोली कारागृहातून दिल्लीच्या नायब राज्यपालांना पत्र लिहिले असून, आम आदमी पक्षाच्या नेत्यावर मोठा आरोप केला आहे. तसेच या आरोपांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
सुकेश चंद्रशेखर यांनी आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना प्रोटेक्शन मनी म्हणून १० कोटी रुपये दिल्याचा मोठा आरोप केला आहे. सुकेश चंद्रशेखर यांनी नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांना लिहिलेल्या पत्रात, आपली सत्येंद्र जैनसोबत २०१५ पासून ओळख असल्याचा दावा केला आहे. आम आदमी पक्षाकडून दक्षिण भारतात महत्त्वाचे पद दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. आम आदमी पक्षाला ५० कोटींहून अधिकची देणगी दिली असल्याचे सुकेश चंद्रशेखरने म्हटले आहे.
सत्येंद्र जैन यांनी दरमहा दोन कोटी रुपये मागितले होते
सन २०१९ मध्ये सत्येंद्र जैन पुन्हा तुरुंगात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सचिव आणि मित्र सुशील हेदेखील सोबत होते. सत्येंद्र जैन यांनी माझ्याकडून दरमहा दोन कोटी रुपये प्रोटेक्शन मनी म्हणून मागितले होते. जेणेकरून तुरुंगात मी सुरक्षितपणे वास्तव्य करू शकतो आणि तुरुंगात सुविधा मिळतील. मला सन २०१७ मध्ये अटक करण्यात आली. मी तिहार तुरुंगात होतो, त्यावेळी जैन हे तुरुंग मंत्री होते. ते अनेकदा तुरुंगात आले आणि माझ्यावर दबाव टाकला. तपास यंत्रणांना मी दिलेल्या देणगीबाबत कोणतीही वाच्यता न करण्याचे त्यांनी सांगितले.
सत्येंद्र जैनने पैसे देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला
सत्येंद्र जैनने पैसे देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. या दबावामुळे दोन-तीन महिन्याच्या कालावधीत माझ्याकडून १० कोटींची रक्कम वसूल करण्यात आली. ही सगळी रक्कम सत्येंद्र जैन यांचे कोलकातामधील निकटवर्ती असलेल्या चतुर्वेदी यांच्याकडून वसूल करण्यात आली होती. चतुर्वेदीमार्फत सत्येंद्र जैन यांना १० कोटींची रक्कम दिली असल्याचा दावा सुकेशने पत्रात केला आहे.
दरम्यान, सत्येंद्र जैन मागील सात महिन्यांपासून तिहार तुरुंगात आहे. त्याने मला तुरुंग प्रशासनाच्या माध्यमातून धमकी दिली. मी हायकोर्टात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला. त्यासाठी त्रास देत धमकी देण्यात आली असल्याचे सुकेश चंद्रशेखरने आपल्या पत्रात म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"