लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने माजी नोकरशहा सुखबीर सिंग संधू आणि ज्ञानेश कुमार यांची नवीन निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. या दोन नावांना अंतिम रूप देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील उच्चाधिकार समितीची गुरुवारी बैठक झाली. समितीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी उपस्थित होते.
पत्रकारांना संबोधित करताना चौधरी म्हणाले की, दोन निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी सहा नावे समितीसमोर आली. त्यापैकी संधू व कुमार यांची नावे उच्चाधिकार समितीने बहुमताने अंतिम केली आहेत. निवड समितीच्या शिफारसीच्या आधारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू निवडणूक आयोगाच्या दोन सदस्यांची नियुक्ती करतील. नव्या कायद्यानुसार या पहिल्या नियुक्त्या असतील. कायद्याने तीन सदस्यीय निवड समितीला निवड समितीने यादीत न घेतलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्याचा अधिकार दिला.
सहा नावांतून निवड
उत्पल कुमार सिंग, प्रदीप कुमार त्रिपाठी, ज्ञानेश कुमार, इंदीवर पांडे, सुखबीर सिंग संधू, सुधीर कुमार, गंगाधर रहाटे या सर्व माजी सहा नोकरशहांच्या नावांची यादी करण्यात आली होती. त्यापैकी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची नावे निवडणूक आयुक्तपदी नियुक्तीसाठी अंतिम करण्यात आली.
आधीचा कायदा...
यापूर्वी निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून सरकारच्या शिफारशीनुसार केली जात होती. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्येष्ठांची नियुक्ती केली जात होती.