ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपुरम, दि. 7 - भारत-चीन सीमेजवळ मे महिन्यात झालेल्या दुर्घटनेत शहीद झालेले सुखोई विमानातील पायलट एस. अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. शहीद एस.अचुदेव यांच्या वडिलांनी दुर्घटनाप्रकरणी उच्च स्तरिय चौकशीची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वायु सेना प्रमुख बिरेंद्र सिंह धनोवा यांनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी मुलाच्या मृत्यबाबत संशय व्यक्त केला आहे.
फ्लाईट लेफ्टनंट अचुदेव आणि स्क्वॉड्रन लीडर डी. पंकज यांच्या सुखोई विमानात 23 मे रोजी भारत-चीन सीमेवर अपघात झाला. दुर्घटनेच्या तीन दिवसांनंतर विमानाचे अवशेष आढळून आले. यानंतर दोन्ही शहिदांचं पार्थिव त्यांच्या घरी पाठवण्यात आले. अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, घरी आलेल्या शवपेटीत त्यांच्या मुलाचे पार्थिव नव्हते. असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
अधिका-यांनी दिलेल्या माहितीवर शहीद अचुदेव यांच्या वडिलांनी यांनी सांगितले की, दुर्घटनेत वाईटरित्या होरपळल्याने मुलाच्या पार्थिवाची ओळख करणं कठीण होतं. सैन्याला त्यांचं पाकिट मिळालं त्याआधारे अचुदेव यांची ओळख पटवण्यात आली, असे सांगण्यात आले.
तर दुसरीकडे, शहीद अचुदेव यांचे वडील म्हणत आहेत की, दुर्घटनेत मुलाच्या पाकिटाचं काहीही नुकसान झाले ही बाब स्वीकारार्ह नाही. शिवाय, त्याच्या पाकिटातील रोखरक्कम आणि बँक कार्डही व्यवस्थित आहेत. मृत्यूची सांगण्यात आलेली कारणं आणि देण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये तफावत आहे. या घटनेमागे कोणती तरी दुसरीच गोष्ट दिसत असल्याचं सांगत त्यांनी संशय व्यक्त केला आहे.
वायुसेनेनं या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र अचुदेव यांच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वायुसेनेच्या प्रमुखांना पत्र लिहून उच्च स्तरिय चौकशीची मागणी केली आहे.
(चीनच्या सीमारेषेजवळून भारताचे अत्याधुनिक सुखोई विमान बेपत्ता)
नेमकी काय आहे घटना ?
भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता सुखोई एसयू 30 जेट फायटरचा 23 मे रोजी अपघात झाला. तेजपूर येथील हवाई दलाच्या तळाजवळ विमानाचे अवशेष सापडले. भारतीय हवाई दलाच्या दिमतीत असलेल्या अत्याधुनिक सुखोई लढाऊ विमानांपैकी एक विमान आसामधील चीनला लागून असलेल्या सीमारेषेजवळून बेपत्ता झाले होते. नियमित सरावासाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळात सुखोई एसयू 30 जेट फायटर विमान बेपत्ता झाले होते.
हे विमान नियमित सरावासाठी गेले असताना बेपत्ता झाले होते. 23 मे रोजी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास आसाममधील तेजपूर हवाई अड्ड्यावरून सुखोई एसयू30 जेट फायटरने दोन वैमानिकांसह नेहमीप्रमाणे उड्डाण केले. त्यानंतर सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास तेजपूरच्या उत्तरेस 60 किमी अंतरावर असताना वैमानिकांशी अखेरचा संपर्क झाला होता. तेजपूर हवाई अड्डा चिनी सीमारेषेपासून 172 किमी अंतरावर आहे.
मार्च महिन्यातही राजस्थानमधील बारमेरमध्येही सुखोई 30 हे लढाऊ विमान कोसळले होते. या घटनेत तीन ग्रामस्थ जखमी झाले होते. हवाई दलाच्या ताफ्यातील सात सुखोई ३० विमानांचा आत्तापर्यंत अपघात झाला आहे.