सुकमा: छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. मरईगुडामधील लिंगनपल्ली तळावरील एका सीआरपीएफ जवानानं स्वत:च्या साथीदारांवरच गोळीबार केला आहे. यामध्ये ४ जवानांचा मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.
मरईगुडातील लिंगनपल्ली तळावर सीआरपीएफच्या ५० व्या बटालियनच्या जवानांमध्ये काही कारणामुळे वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की एका जवानानं बेछूट गोळीबार सुरू केला. गोळीबारात अनेक जवान जखमी झाले. या सगळ्यांवर रायपूरमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेवर अद्याप वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. आरोपी जवानाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे.
सीआरपीएफच्या जवानानं रात्री १ च्या सुमारास त्याच्या साथीदारांवर गोळीबार केला. मध्यरात्री अचानक घडलेल्या घटनेनंतर सीआरपीएफच्या तळावर खळबळ माजली. बस्तरचे आयजी पी. सुंदरराज यांनी गोळीबाराच्या घटनेची माहिती दिली. मात्र कोणत्या कारणामुळे जवानांमध्ये वाद झाला होता, याची माहिती अद्याप तरी समोर आलेली नाही.