सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. जगरगुंडा येथील बेद्रे भागात नक्षलवाद्यांनी ही घटना घडवली. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला असून एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी जगरगुंडा येथील बेद्रे कॅम्पजवळ नक्षलवाद्यांनी हल्ला केला. सर्च ऑपरेशनसाठी निघालेल्या जवानांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफ 165 व्या बटालियनचे उपनिरीक्षक सुधाकर रेड्डी शहीद झाले आणि कॉन्स्टेबल रामू हे गोळी लागल्याने जखमी झाले. जखमी रामू यांना प्राथमिक उपचार करून हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. हल्ल्यानंतर सर्च ऑपरेशनदरम्यान जवानांनी ४ संशयितांना ताब्यात घेतले. यानंतर सुरक्षा दल आजूबाजूच्या भागात सखोल सर्च ऑपरेशन राबवत आहेत. सर्च ऑपरेशनमध्ये सीआरपीएफ, कोब्रा आणि जिल्हा दलाचे जवान सहभागी आहेत.
राज्यात आठवडाभरात सहा नक्षलवादी हल्ले झाले आहेत. नक्षलवाद्यांकडून ५० हून अधिक आयईडी स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या कांकेरमध्ये भूसुरुंगाचा स्फोट केला होता. या स्फोटात बीएसएफचा एक जवान शहीद झाला. हा जवान उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. मिळालेल्या माहितीनुसार, परतापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सदकटोला गावात हा स्फोट झाला. बीएसएफ आणि जिल्हा पोलिस दलाचे जवान संयुक्तपणे गस्त घालत होते. याचदरम्यान हा स्फोट झाला. यापूर्वी नारायणपूरमध्येही नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. छत्तीसगड निवडणुकीपूर्वी कांकेरमध्येच नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला होता.
पोलिसांचा खबरी समजून हत्या निवडणुकीदरम्यान, विजापूर जिल्ह्यातही नक्षलवाद्यांनी एका ४० वर्षीय तरुणाची पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून हत्या केली होती. ७ नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर न जाण्याचा इशाराही नक्षलवाद्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी मृताचे नाव मुचकी लिंगा असल्याचे सांगतिले होते. नक्षलवाद्यांनी त्याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह विजापूर जिल्ह्यातील गलगाम आणि नदापल्ली गावांदरम्यान रस्त्याच्या कडेला फेकून दिला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांनी लिंगा याच्यावर पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप केला होता.