Sukma News:छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नक्षलवाद्यांनी निमलष्करी दलातील जवानांच्या ट्रकला उडवण्यासाठी आयईडी स्फोट घडवून आणला. या घटनेत सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले असून, अनेक जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
एसपी किरण चव्हाण यांनी सांगितले की, जगरगुंडा भागातील कॅम्प सिल्गर येथून 201 कोब्रा कॉर्प्सची तुकडी आरओपी ड्युटीदरम्यान कॅम्प टेकलगुडेम येथे जात होती. या ताफ्यात ट्रक आणि मोटारसायकलींचा समावेश होता. सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी कॅम्प सिल्गर ते टेकलगुडेम या मार्गावर आयईडी पेरला होता.
आज (23 जून) दुपारी 3 वाजताच्या सुमारास जवानांची ट्रक येताच आयईडी स्फोट झाला. या घटनेत ट्रक चालक आणि सहचालक जागीच शहीद झाले, तर इतर काही सैनिक जखमी आहेत. विष्णू आर आणि शैलेंद्र अशी शहीद जवानांची नावे आहेत. शहीद जवानांचे पार्थिव घटनास्थळावरुन बाहेर काढण्यात आले आहे. सध्या जवान या परिसरात शोधमोहिम राबवत आहेत.
बनावट नोटा जप्त आजच पोलीस, CRPF आणि DRG च्या टीमने सुकमा जंगलात बनावट नोटा आणि प्रिंटर मशीन जप्त केले. छाप्यादरम्यान 100, 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा आणि प्रिंटर मशीनही सापडले. याशिवाय शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. गावकऱ्यांना फसवून नक्षलवादी बनावट नोटा बाजारात आणत होते. सुकमातील कोरागुडा भागात ही शोध मोहीम राबवण्यात आली.