ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - दिल्लीत पुन्हा एकदा गाडयांसाठीचा सम-विषम फॉर्म्युला लागू करण्यात येणार आहे. १५ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान सम-विषम फॉर्म्युल्याचा दुसरा टप्प्याची अंमलबजावणी करण्यात येईल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी पत्रकारपरिषदेत सम-विषम फॉर्म्युल्याच्या दुस-या टप्प्याची घोषणा केली.
१ ते १५ जानेवारी दरम्यान पहिला टप्पा राबवल्यानंतर दिल्लीकरांकडून जो प्रतिसाद मिळाला त्याआधारावर दुसरा टप्पा राबवण्याचा निर्णय घेतला अशी माहिती केजरीवाल यांनी दिली. या योजनेनुसार सम तारखेला सम क्रमांकाच्या आणि विषम तारखेला विषम क्रमांकाच्या गाडया दिल्लीच्या रस्त्यावर धावल्या होत्या.
दिल्लीतील ८१ टक्के जनतेने सम-विषम फॉर्म्युल्याच्या बाजूने कौल दिल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. दुस-या टप्प्यात कोणत्या वाहनांना वगळायचे त्यासंबंधी अजून निर्णय झालेला नाही. दिल्लीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीतील सरकारने सम-विषण फॉर्म्युल्याचा निर्णय घेतला होता.