नवी दिल्ली : आपल्याला बेकायदेशीररीत्या अटक तसेच छळ केल्याच्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या तक्रारीवरून लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना समन्स बजावले आहेत. तसेच या प्रकरणी साक्ष देण्यासाठी १५ जूनला या समितीसमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
नवनीत राणा प्रकरणी लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे, भायखळा महिला कारागृहाचे अधीक्षक यशवंत भानुदास यांनाही १५ जूनला समितीसमोर हजर होण्यासाठी समन्स बजावले आहेत. खासदार नवनीत राणा यांनी २३ मे रोजी लोकसभेच्या विशेषाधिकार समितीकडे तक्रार केली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचे खासदार नवनीत राणा व त्यांचे पती रवी राणा यांनी जाहीर केले होते. त्यानंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी २३ एप्रिल रोजी अटक केली होती.