लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून दाखल मानहानी खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसचे नेते जयराम रमेश, पवन खेडा आणि नेट्टा डिसूझा यांना शुक्रवारी समन्स जारी केले आहेत. तसेच इराणी व त्यांची मुलगी यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी काँग्रेसच्या नेत्यांनी सोशल मीडियावरील ट्वीट, रिट्वीट, पोस्ट, व्हिडिओ आणि छायाचित्रे हटवावीत, असे निर्देश न्या. मिनी पुष्कर्णा यांनी दिले आहेत.
इराणी यांनी त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्या मुलीविरुद्ध कथितरीत्या करण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी दोन कोटी रुपयांहून अधिक भरपाईची मागणी केली आहे. प्रतिवादींनी २४ तासांच्या आत जर निर्देशांचे पालन केले नाही, तर ट्विटर, फेसबुक आणि यूट्युबने पाेस्ट हटवाव्यात.
आरोप आणि कारवाई... स्मृती इराणी यांच्या १८ वर्षीय मुलीने गोव्यात अवैध बार चालविल्याचा आरोप काँग्रेसच्या या नेत्यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी इराणी यांना मंत्रिमंडळातून हटविण्याची मागणीही त्यांनी केली आहे. त्यानंतर इराणी यांनी कायदेशीर कारवाई केली आहे. पुढील सुनावणी १५ नोव्हेंबर रोजी न्यायालयात आणि रजिस्ट्रारसमोर १८ ऑगस्ट रोजी होईल.