नवी दिल्ली : काँग्रेस नेते शशी थरुर यांना परदेशात जाण्याची परवानगी राउज एवेन्यू कोर्टाने दिली आहे. शशी थरुर यांना 5 ते 20 मेपर्यंत अमेरिकेत जाण्यासाठी कोर्टाने परवानगी दिली आहे. पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी शशी थरुर यांच्यावर कलम 498-अ आणि 306 नुसार आरोप करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप त्यांनी अटक करण्यात आली नाही.
दरम्यान, शशी थरुर यांनी राउज एवेन्यू कोर्टात अर्ज दाखल करुन 5 ते 20 मेच्या दरम्यान अमेरिकेला जाण्याची परवानगी मागितली होती. यावेळी कोर्टाचे विशेष न्यायाधीश अरुण भारद्वाज यांनी शशी थरुर यांच्या अर्जावर दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवून उत्तरांची मागणी केली होती. पोलिसांच्या उत्तरानंतर कोर्टाने शशी थरुर यांनी परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे.
2014 मध्ये शशी थरुर यांच्या बंगल्याचे काम सुरु होते. त्यामुळे शशी थरुर आपल्या पत्नीसोबत दिल्लीतील एका हॉटेलमध्ये राहत होते. त्यावेळी हॉटेलच्या रुममध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्यांची हत्या झाल्याची नोंद केली होती. मात्र, आरोपपत्रात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद केला होता.