नवी दिल्ली- भारतीय जनता पार्टीचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सुनंदा पुष्कर खटल्याबाबत केलेली विनंती सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. सुनंदा पुष्कर खटल्याचा तपास कोर्टाच्या निरीक्षणाखाली विशेष तपासणी पथक नेमून करावा अशी विनंती त्यांनी केली होती.
स्वामी यांची विनंती फेटाळताना न्यायालयाने याबाबत आरोपपत्र दाखल झाले असून पुढील कार्यवाही आधीच झालेली आहे असे कारण दिले. स्वामी यांनी यासंदर्भात आणखी काही टिप्पणी कोर्टाने करावी अशी विनंती केल्यावर न्यायाधीश अरुण मिश्रा आणि न्यायाधीश एस. अब्दुल नाझीर यांनी प्रकरण संपले आहे (विनंतीचे) असे सांगत काम थांबवले.
सुनंदा पुष्कर या काँग्रेसचे खासदार आणि माजी मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी होत्या. त्यांना आत्महत्या करण्यास थरुर यांनी भाग पाडले असा पोलिसांनी त्यांच्यावर आरोप ठेवला आहे. सुनंदा पुष्कर व शशी थरुर यांचा 2010 साली विवाह झाला होता. 17 जानेवारी 2014 रोजी सुनंदा पुष्कर यांचा दिल्लीमधील हॉटेल लीला पॅलेस येथे मृतदेह आठळून आला होता. न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास व्हावा अशी विनंती स्वामी यांनी केली होती.