नवी दिल्ली : काँग्रेस नेते शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यू प्रकरणी नेमलेल्या मेडिकल बोर्डाने अहवाल दिल्ली पोलिसांना सादर केला आहे. तथापि, सुनंदा यांच्या मृत्यूबाबत निष्कर्ष काढण्यात बोर्डाला अपयश आले आहे. मेडिकल बोर्डाने दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) आपला अहवाल सादर केला आहे. एफबीआय आणि एम्सच्या अहवालाचा अभ्यास करूनही सुनंदा यांचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण बोर्ड नोंदवू शकले नाही. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, महिनाभरापूर्वीच हा अहवाल एसआयटीला मिळाला आहे. तथापि, सुनंदा यांचा मृत्यू कशामुळे झाला, याचा निष्कर्ष काढण्यास बोर्डाला अपयश आले आहे. आम्ही त्यांना एफबीआय व एम्सच्या अहवालाचा अभ्यास करण्यास सांगितले आहे. एफबीआय आणि एम्सच्या अहवालाचा अभ्यास करून निष्कर्ष काढण्यासाठीच बोर्डाची स्थापना करण्यात आली होती. सुनंदा यांच्या फोनमधील डिलिट केले संभाषण परत मिळविण्याचा प्रयत्न आता पोलिस करीत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुनंदा यांच्या व्हिसेराचे नमुने पोलिसांनी एफबीआय प्रयोगशाळेतून परत आणले होते. त्यासाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक अमेरिकेला गेले होते. आपल्या निरीक्षणाची अंतिम यादी देण्याची विनंती पोलिसांनी आता एफबीआयच्या प्रयोगशाळेला केली आहे. १७ जानेवारी २0१४ रोजी ५१ वर्षीय सुनंदा यांचा मृतदेह दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलात सापडला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सुनंदा पुष्कर मृत्यूचे कारण कळतच नाही
By admin | Published: January 28, 2017 11:46 PM