ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाल्याचे 'एम्स'च्या अहवालात म्हटले आहे. अमेरिकेच्या एफबीआय प्रयोगशाळेने पाठवलेल्या सुनंदा पुष्कर यांच्या व्हिसेरा अहवालाचा एम्सच्या मेडिकल बोर्डाने अभ्यास करुन आपला निष्कर्ष दिल्ली पोलिसांना कळवला आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त बी.एस.बस्सी यांनी आज ही माहिती दिली.
विशेष पोलिस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) दीपक मिश्रा या प्रकरणाच्या तपासाच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत असे बस्सी यांनी सांगितले. मिश्रा आणि एसआयटीच्या अधिका-यांची बैठक झाल्यानंतर मीडियाला याबद्दल माहिती देण्यात येईल असे बस्सी यांनी सांगितले.
माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर जानेवारी २०१४ मध्ये दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच त्यांनी शशी थरुर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्याशी प्रेमप्रकरण सुरु असल्याचा आरोप केला होता.
एफबीआय प्रयोगशाळेने आपल्या अहवालात सुनंदा यांच्यावर पोलोनियम किंवा अन्य किरणोत्सारी विषप्रयोग झाल्याची शक्यता फेटाळून लावल्याचे बस्सी यांनी मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सांगितले होते. एम्सच्या मेडिकल बोर्डाने सुनंदा यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा निष्कर्ष काढला होता. मात्र नेमके कोणते विष वापरण्यात आले ते स्पष्ट केले नव्हते. त्यासाठी सुनंदा यांचा व्हिसेरा अहवाल तपासणीसाठी वॉशिंग्टनच्या एफबीआय प्रयोगशाळेत पाठवला होता.
Have been told that Medical Board's advice in late Sunanda's case has been received. Deepak is reviewing progress. Merits shall be ensured— BS Bassi (@BhimBassi) January 15, 2016