सुनंदा पुष्कर यांची हत्याच ?, गुप्त अहवालातून उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 04:08 AM2018-03-13T04:08:28+5:302018-03-13T04:08:28+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांची हत्या झाल्याचा वैद्यकीय अहवाल दिल्ली पोलिसांनी उघड केला आहे. सुनंदा यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हे, तर विषप्रयोगानंच झाला आहे, असं या अहवालातून स्पष्ट करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांची हत्या झाल्याचा वैद्यकीय अहवाल दिल्ली पोलिसांनी उघड केला आहे. सुनंदा यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हे, तर विषप्रयोगानंच झाला आहे, असं या डीएनए अहवालातून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ आणखी वाढत चाललं आहे. विशेष म्हणजे या अहवालामुळे शशी थरूर यांच्या अडचणीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर यांनी 2010मध्ये विवाह केला. त्यानंतर चार वर्षांनी दिल्लीतल्या लीला पॅलेस या हॉटेलमध्ये 17 जानेवारी 2014 रोजी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाला. त्यावेळी सुद्धा तत्कालीन पोलीस उपायुक्त बी. एस. जयस्वाल यांनी सुनंदा यांचा मृत्यू नैसर्गिकरीत्या नव्हे, तर विषप्रयोगानं झाल्याचा निष्कर्ष तपासात नोंदवला होता. उपविभागीय दंडाधिकारी आलोक शर्मा यांनीसुद्धा या प्रकरणाची आत्महत्येचे प्रकरण म्हणून चौकशी न करता खुनाच्या अनुषंगानं चौकशी करण्याचे आदेशही पोलिसांना दिले होते. वैद्यकीय अहवालानुसार सुनंदा पुष्कर यांच्या शरीरावर जखमा दिसल्या आहेत. तसेच त्यांना इंजेक्शन दिल्याच्याही खुणा सापडल्या आहेत. त्याच वेळी सुनंदा यांची एखाद्या व्यक्तीसोबत धक्काबुक्की झाल्याचंही अहवालातून स्पष्ट करण्यात आलं आहे. या गुप्त अहवालामुळे सुनंदा पुष्कर प्रकरणास नवे वळण लागले असून, थरूर यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालात सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाल्याचे म्हटले होते. दिल्ली पोलिसांनी जानेवारी 2015मध्ये पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अमेरिकेतील तपास यंत्रणा एफबीआयचीदेखील मदत घेतली होती. पुष्कर यांचा मृत्यू पोलोनियम किंवा अन्य किरणोत्सर्गी घटकांमुळे झाला नाही असा अहवाल एफबीआयने दिला होता. पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानी लेखक आणि पत्रकार मेहेर तरार यांचीदेखील कसून चौकशी केली होती.
तर सुब्रहमण्यम स्वामी यांनी 6 जुलै 2017 रोजी दिल्ली उच्च नायालयात जनहित याचिका दाखल केली होती. सुनंदा पुष्कर यांच्या संशयास्पद मृत्यूचा पुन्हा एकदा सीबीआय तपास केला जावा, अशी मागणी याचिकेतून स्वामींनी केली होती. केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या वकिलाने सुब्रहमण्यम स्वामींच्या याचिकेला विरोध करत तपासावर शशी थरुर यांचा कोणताही प्रभाव नसल्याचं उच्च न्यायालयाला सांगितलं होतं. शशी थरुर यांचा दबाव असल्याने सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचा तपास व्यवस्थित केला जात नसल्याचा स्वामींचा आरोप निराधार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. न्यायालयानेदेखील सुब्रहमण्यम स्वामींनी दिलेल्या माहितीवर आक्षेप नोंदवला होता.