कर्नाटकातकाँग्रेसने विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवलं. या निवडणुकीचे श्रेय रणनीतीकार सुनील कडुगोल यांना देण्यात आलं. आता काँग्रेसने त्यांना मोठं बक्षीस दिलं आहे. कडुगोलू यांची कॅबिनेट मंत्रिपदासह मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्री कार्यालयाने गुरुवारी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नियुक्ती निश्चित झाली असून लवकरच याबाबतचा आदेश काढण्यात येणार असल्याचं सागण्यात येत आहे. पक्षाचे हायकमांड पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीसाठी सुनील कडुगोलू यांचा वापर करण्यास उत्सुक आहे.
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात अजिबात सत्ता जाणार नाही, मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला विश्वास
कर्नाटकातील मागील भाजप सरकारच्या विरोधात '४० टक्के' आणि 'पे सीएम' सारख्या विकास मोहिमांमागील काँग्रेसच्या कोअर टीममधील कडुगोलू एक आहेत. कडुगोलू, अभियांत्रिकी पदवीधर आहेत त्यांचा जन्म बल्लारी जिल्ह्यात झाला आणि नंतर ते चेन्नई आणि बंगळुरू येथे राहिले. त्यांच्याकडे फायनान्समध्ये एमएसची पदवी आहे आणि ते एमबीए देखील आहेत. त्यांच्या फर्म माइंडशेअर अॅनालिटिक्सने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेससाठी काम केले.
कडुगोलू यांनी डीएमकेचे माजी प्रमुख आणि आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासोबतही काम केले आहे. २०१६ मधील राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 'नमक्कू नाम' हे कॅम्पनींग त्यांनी सुरू केलं. ते यात यशस्वी ठरले आणि स्टॅलिन यांची सार्वजनिक प्रतिमा मोठ्या प्रमाणात उंचावली, पण DMK निवडणूक जिंकण्यात अपयशी ठरला आणि AIADMK ने सत्ता राखली.
कडुगोलू यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रख्यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबतही काम केले आहे, पण नंतर ते वेगळे झाले आणि त्यांनी स्वतःची फर्म सुरू केली. कर्नाटक निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पडद्यामागील रणनीतीकार म्हणून काम करत राहिले.