सुंजवा (जम्मू) : जम्मूतील सुंजवा येथील लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यातील 4 दहशतवाद्यांना मारण्यात 40 तासांनी सैन्याला यश आले, मात्र या चकमकीत सैन्याचे 5 जवान शहीद झाले, तर एका निष्पाप नागरिकाचाही मृत्यू झाला. दहशतवाद्यांविरोधातील कारवाई अखेर संपली असून परिसरात तपास मोहीम सुरू आहे. या दरम्यान एक दिलासादायक वृत्त समोर आलं आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या 35 आठवड्यांच्या गर्भवतीने रात्रभर मृत्यूशी झुंज देत एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
जम्मू-काश्मीर लाइट इन्फन्ट्रीच्या 36 ब्रिगेडच्या शिबिरावर शनिवारी (10 फेब्रुवारी) जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. पहाटे पाचच्या सुमारास अंधारात या तळाच्या मागील बाजूकडील निवासी भागातून जैश ए मोहम्मद संघटनेचे चार ते पाच दहशतवादी आत शिरले. या तळावर कुटुंबीयांसह राहणाऱ्या जवानांसाठी वसाहती आहेत. मागील बाजून आतमध्ये येताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबाराला सुरूवात केली. त्यावेळी जवळपास सर्वजण झोपले होते. अचानक सुरू झालेल्या गोळीबारामुळे राइफलमॅन नजीर अहमद यांच्या पत्नी शाझदा यांनी सुरक्षित ठिकाणी पळण्याचा प्रयत्न केला. पण अंदाधुंद गोळीबारात एक गोळी त्यांच्या कमरेच्या खालच्या भागाला लागली. त्यांची किंकाळी ऐकून शेजारचे बाहेर आले आणि शाझदा यांना आतमध्ये खेचलं.
त्यानंतर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांना तात्काळ सैन्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्यांचं बरंच रक्त शरीरातून वाहून गेले होतं. या महिलेचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. एका रात्रीत शाझदा यांच्यावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. गोळी काढण्यासोबतच 9 महिने पूर्ण होण्याआधीच त्यांची प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा त्यांच्या शरीरातील गोळी काढण्यात आली त्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली आणि अखेर शाझदा यांनी एका 2.5 किलोग्रॅम वजनाच्या एका गोंडस मुलीला जन्म दिला.
आई व मुलीची प्रकृती स्थिर असून शाझदा यांना सध्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आलंय तर मुलीला एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. या मुलीचा फोटो सोशल मीडियावर एका ट्विटर युझरने शेअर केला. फोटो काही क्षणातच व्हायरल झाला आणि अनेक सोशल मीडिया युझर्सनी ही घटना चमत्कारापेक्षा कमी नसल्याचं म्हटलं.