कोझीकोड: सध्या केरळमध्ये निपाह विषाणूनं थैमान घातलं आहे. यामध्ये 10 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. निपाह विषाणूवर कोणतीही लस उपलब्ध नसल्यानं लोकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. यावर आता सुन्नी समुदायाचे नेते नजर फैजी कुदाथयी यांनी एक अजब उपाय सांगितला आहे. निपाह विषाणूला रोखण्यासाठी आध्यात्मिक उपचार घेण्याचा सल्ला कुदाथयी यांनी दिला आहे. निपाह विषाणूचा फैलाव झालेल्या परिसरातील लोकांनी कुराणमधील 36 वा अध्याय वाचावा, असं कुदाथयी यांनी म्हटलं आहे. याशिवाय या भागातील रहिवाशींनी शेख अब्दुल कादीर जिलानी यांच्या नावाचा एक हजारवेळा जप करावा, असंही ते म्हणाले आहेत. असं केल्यास निपाह विषाणूचा संसर्ग होणार नाही, असा दावा त्यांनी केला. कुदाथयी यांचा संदेश सध्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाला आहे. कुदाथयी सुन्नी युवजना संगम संघटनेचे राज्य सचिव आहेत. वरिष्ठ सुन्नी विद्नान वावद कुन्हाकोया मुसालीर यांनी निपाह विषाणूची बाधा होऊ नये, यासाठी उपाय सांगितला असल्याचं कुदाथयी यांनी म्हटलं आहे. निपाहचा फैलाव झालेल्या भागात राहणाऱ्या लोकांनी धोका टाळण्यासाठी मनकूस मौलिदचा आधार घ्यावा, असं कुदाथयी यांनी म्हटलं आहे. मनकूस मौलिद हा प्रार्थनचा एक प्रकार आहे. मल्ल्याळी लोक आजारापासून दूर राहण्यासाठी ही प्रार्थना करतात. 500 वर्षांपूर्वी शेख जैनुद्दीन मखदूम यांनी पहिल्यांदा ही प्रार्थना केली होती, असं मानलं जातं. निपाह विषाणूचा फैलाव झालेल्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांनी आध्यात्मिक उपाय करावेत, असं आवाहन कुदाथयी यांनी केलं. त्यासाठी त्यांनी एक व्हॉईस मेसेज तयार करुन तो अनेकांना व्हॉट्सअॅप केला आहे. लोकांनी हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. डॉक्टरांनी सांगितलेली काळजी घेत असताना त्याला अध्यात्मिक उपचारांची जोड द्या, असं त्यांनी म्हटलं आहे.
कुणाचं काय तर कुणाचं काय; 'निपाह व्हायरस'पासून वाचण्यासाठी मौलवीने सुचवला अजब उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 3:50 PM