नवी दिल्ली - अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ५ ऑगस्ट भूमिपूजन होत आहे. मात्र, या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थितीच राज्यघटनेला धरुन नसल्याचे एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असुदुद्दीन औवेसी यांनी म्हटले आहे. त्यानंतर, आता सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष जुफर अहमद फारुकी यांनी अयोध्येत मशिद बांधणार असल्याचे सांगत, त्यासाठी ट्रस्टची घोषणाही केली आहे. अयोध्येतील 5 एकर जागेवर या ट्रस्टच्या माध्यमातून मशीद बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राम मंदिर भूमिपूजनाची तयारी अंतिम टप्प्यात असून ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत २२.६ किलो चांदीची वीट ठेऊन राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. फैजाबादचे भाजपचे खासदार लल्लू सिंह यांनी याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे. त्यांनी या विटेचे छायाचित्र शेअर करुन सांगितले की, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होत असलेल्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळणार आहे. चांदीच्या या विटेचे वजन २२ किलो ६०० ग्राम आहे. भगवान राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांच्या मूर्तीला रत्नजडीत पोषाख परिधान करण्यात येणार आहे. या पोषाखात ९ प्रकारचे रत्न असणार आहेत. दुपारी १२.१५ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
एकीकडे राम मंदिराच्या भूमिपूजनाची जोरदार तयारी सुरु असताना, दुसरीकडे अयोध्येत मशीद बांधण्याची घोषणा सुन्नी वक्फ बोर्डाकडून करण्यात आली आहे. त्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आले असून त्यामध्ये एकूण 15 सदस्य असणार आहेत. या 16 पैकी 9 जणांच्या नावांची घोषणाही फारुकी यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील सुन्नी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष फारुकी हेच या ट्रस्टचे अध्यक्ष राहतील, असेही त्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशींच्या खंडपीठाने राम मंदिराच्या वादावर नोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च निकाल दिला. त्यानुसार, केंद्र सरकारला राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्टची स्थापन करण्यास सांगितले होते. तसेच, अयोध्येत मशीद बांधण्यासाठी स्वतंत्रपणे 5 एकर जागा देण्याचीही सूचना न्यायालयाने केली होती. त्यानुसार, आता सुन्नी वक्फ बोर्डाने मशीद बांधण्यासाठी ट्रस्टच्या स्थापनेची घोषणा केली आहे.
दरम्यान, असुदुद्दीन औवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भूमीपूजन समारंभात सहभागी होणे हे पंतप्रधानपदाच्या संवैधानिक शपथेचं उल्लंघन असल्याचं म्हटलंय. धर्मनिरपेक्षता हाच भारतीय संविधानाचा पाया आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान म्हणून अयोध्येतील सोहळ्याला जात आहेत, की वैयक्तिक हे त्यांनी स्पष्ट करावं, असा सवालही औवेसी यांनी उपस्थित केला आहे. आऊटलूक या वेबपोर्टला दिलेल्या मुलाखतीत औवेसी यांनी बाबरी मशिद आणि अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनसंदर्भात आपले मत व्यक्त केले.