नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. सनी देओल यांनी पंजाबमधील गुरुदासपूर मतदार संघातून भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता राजकीय आखाड्यात सनी देओल आपले नशीब अजमवणार आहे.
भाजपाकडून आज लोकसभेच्या तीन जांगासाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये सनी देओल यांनी गुरुदासपूर मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर किरण खेर यांना चंदीगड आणि सोम प्रकाश यांना होशियारपूर मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपा अध्यक्ष अमित शहा व सनी देओल यांच्या भेटीचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आज सनी देओल यांनी संरक्षणमंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी, "नरेंद्र मोदींनी या देशासाठी बरंच काही केले असून पुढची पाच वर्ष त्यांनाच सत्ता मिळाली पाहीजे. माझे वडील अटल बिहारी वाजपेयींपासून भाजपासोबत जोडले गेले आणि मी नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपासोबत जोडलो गेलो आहे," असे सनी देओल यांनी म्हटले.
सनी देओल यांचे वडील व ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे भाजपाशी जोडले गेलेले आहेत. 2004 मध्ये भाजपाच्या तिकिटावर त्यांनी राजस्थानच्या बिकानेरमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर स्वत: ला राजकारणापासून वेगळे केले होते; परंतु ते मागील काही दिवसांपासून मथुरेत पत्नी हेमामालिनी यांच्यासाठी जो निवडणूक प्रचार करीत आहेत, ते पाहता राजकारणाबाबत त्यांचे मन बदलत आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.