हरयाणा - बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सनी देओल भाजपाकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदार संघातून भाजपाने त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सनी देओलने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपल्या चल-अचल संपती आणि वैयक्तिक जीवनाबद्दलची माहितीही या अर्जासोबत दिली आहे.
सनी देओलने सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सनीने आपला उमेदवारी अर्ज भरताना पगडी परिधान केली होती. तसेच, त्यांनी 'अजय सिंह देओल' या नावाने अर्ज दाखल केला. यावेळी त्याच्यासोबत केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह आणि जितेंद्र सिंह उपस्थित होते. तसेच, सनी देओल यांचा भाऊ आणि अभिनेता बॉबी देओल यांनीही हजेरी लावली होती. या अर्जसोबतच सनीने आपल्या संपत्ती आणि शिक्षणाचेही विवरण दिले आहे.
सनीने 1977-78 मध्ये एक्टींगचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. तर सनीकडे एकूण 87 कोटी रुपयांची संपत्ती आहे. मात्र, 53 कोटी रुपयांचे कर्जही सनी देओलला आहे. सनीकडे 60 कोटी रुपयांची जंगम संपत्ती आणि 21 कोटी रुपयांची स्थावर संपत्ती असून बँकेत 9 लाख रुपये आणि 26 लाख रुपयाची रोकड आहे. तर, सनीच्या पत्नीचे नाव पूजा असून त्यांच्याकडे 6 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. पूजा यांच्या बँक खात्यात 19 लाख रुपये असून 16 लाखांची रोकड त्यांच्याकडे आहे. तर पूजा यांच्याकडे कुठलिही स्थावर मालमत्ता नाही.
सनी आणि पूजा देओल यांच्यावर बँकांचे 51 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामध्ये 2.5 कोटी रुपयांचे सरकारी कर्ज असून 7 कोटी रुपयांचे जीएसटी भरणेही बाकी आहे. दरम्यान, सनीचे माता-पिता म्हणजेच हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची संपत्ती एकूण 249 कोटी रुपये एवढी आहे. त्यामध्ये धर्मेंद्र यांच्याकडे 135 कोटी तर हेमा यांच्याकडे 114 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.