बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या 'गदर-२' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, यादरम्यान सनी देओलच्या मुंबईतील जुहू येथील बंगल्याचा लिलाव होणार असल्याचे समोर आले होते. पण, आता या संदर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. सनी देओलच्या बंगल्याचा लिलाव रद्द करण्यात आला आहे. बँकेने नोटीस मागे घेतली आहे. दरम्यान, २४ तासांत बँकेने आपला निर्णय बदलला, त्यावर आता काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून प्रश्न उपस्थित केला आहे की, गेल्या २४ तासांत कोणत्या तांत्रिक कारणांमुळे लिलाव थांबवण्यात आला. जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, "काल दुपारी संपूर्ण देशाला समजले की, बँक ऑफ बडोदाने सनी देओलचा जुहू येथली बंगला ई-लिलावसाठी ठेवला आहे. त्यांनी बँकेला ५६ कोटी परत केले नाहीत. आज सकाळी, २४ तासांच्या आत समजते की, बँकेने तांत्रिक कारणांमुळे लिलाव स्थगित केला आला आहे. आश्चर्य वाटत आहे की, तांत्रिक कारणांना कोणी ट्रिगर केले आहे."
दरम्यान, सनी देओलला २० ऑगस्टला बँक ऑफ बडोदाने नोटीस बजावली होती. सनी देओलने जवळपास ५६ कोटींचे कर्ज घेतले होते, जे त्याने फेडले नाही. त्याबाबत त्याच्या बंगल्याचा लिलाव करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले होते. बँकेने लिलावाची तारीखही जाहीर केली. २५ सप्टेंबरला ई-लिलाव होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र २१ ऑगस्ट रोजी सकाळी बँकेने लिलावावर स्थगिती आणल्याची बातमी समोर आली. दरम्यान, बँकेने सनी देओलला २०१६ मध्ये चित्रपट निर्मितीसाठी हे कर्ज दिले होते.
'गदर-२'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ!११ ऑगस्ट रोजी 'गदर-२' चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी 'गदर-२' ने ४१.१ कोटींची भरघोस कमाई केली होती. मात्र पहिल्या आणि १० व्या दिवशीची खरंतर तुलना होऊ शकत नाही, कारण कमाई हळूहळू कमी होत असते. पण 'गदर-२' बाबतीत असे झालेले नाही. 'गदर २' ने काल रविवारी दहाव्या दिवशी ४१ कोटींचा व्यवसाय केला आहे. तर आतापर्यंत 'गदर-२' चित्रपटाने ३७७.२० कोटींचा गल्ला जमवला आहे.