कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील शिक्षक भरतीसाठीच्या परीक्षेसाठी आलेल्या एका महिलेच्या हॉलतिकीटवर सनी लिओनीचा बोल्ड फोटो लावल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यानंतर काहीवेळातच परीक्षेच्या या हॉलतिकीटचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. तसेच सनी लिओनीचा फोटो असलेल्या हॉलतिकीटची जोरदार चर्चा रंगली आहे.
कर्नाटकमधील शिक्षण विभागाने याप्रकरणाची गंभीर दखल घेत या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाने हॉलतिकीटवर संबंधित महिला उमेवाराऐवजी सनी लिओनीचा फोटो छापला, असा आरोप काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष बीआर. नायडू यांनी केला. विधिमंडळात बसून ब्लू फिल्म पाहणाऱ्या आमदारांच्या पक्षाकडून आपण आणखी काय अपेक्षा ठेवणार, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
काँग्रेस पक्षाच्या या आरोपांना सरकारकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. बीसी नागेश यांच्या माहितीनुसार, परीक्षेसाठी संबंधित उमेदवाराने आपला फोटो अपलोड करायचा असतो. त्यानंतर तो आपोआप हॉलतिकीटवर छापला जातो. या सगळ्या प्रकारानंतर परीक्षा देण्यासाठी आलेल्या संबंधित महिला उमेदवाराची चौकशी करण्यात आली.
तुम्ही सनी लिओनीचा फोटो हॉलतिकीटसाठी अपलोड का केलात, असा प्रश्न संबंधित महिला उमेदवाराला विचारण्यात आला. त्यावर तिने माझ्या नवऱ्याच्या मित्राने माझा फॉर्म भरला होता असं उत्तर दिलं आहे. याप्रकरणात आता गुन्हा दाखल झाला असून शिक्षण विभागाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.