सूरत - गुजरातच्या सूरत शहरात अभिनेत्री सनी लिओनीच्या एका जाहीरातीवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर कंडोमच्या जाहीरातीचा फलक लावण्यात आला असून, त्यावर सनी लिओनीचा फोटो आहे. त्यावर नवरात्रीचा संदेश असल्याने वाद निर्माण झाला आहे्. या जाहीरात फलकाविरोधात शहरातील एका गटाने निषेध आंदोलन आयोजित केले असून, हा फलक काढून टाकण्याचा इशारा दिला आहे.
कंडोमच्या जाहीरातीचा भलामोठा फलक पाहून सूरत शहरातील नागरीकांना धक्का बसला. मोबाईलमुळे ही जाहीरात व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. सोशल मीडियावर लगेच या जाहीरातीचे पडसाद उमटले. नवरात्रीच्या संदेशामुळे धार्मिक भावना दुखावल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. नवरात्री हा गुजरातमधला महत्वाचा उत्सव आहे. देवीच्या वेगवेगळया रुपांची नऊ दिवस पूजा केली जाते.
होर्डींगवर सनी लिओनीच्या फोटोच्या शेजारी 'नवरात्रीत खेळा, पण प्रेमाने' असा संदेश लिहीला होता. कंडोम बनवणा-या कंपनीने या जाहिरातीच्या माध्यमातून हिंदूच्या भावना दुखावल्या आहेत असे उद्योजक आणि हिंदू युवा वाहिनीचे अध्यक्ष नरेंद्र चौधरी यांनी सांगितले. आम्ही हा प्रकार अजिबात खपवून घेणार नाही. होर्डींग हटवले नाही तर, आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र करु असा इशारा चौधरी यांनी दिली. भविष्यात पुन्हा कोणी अशी हिम्मत करु नये यासाठी आंदोलन आवश्यक असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
सनी लिओनीच्या जाहीरातीवरुन वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील सनी लिओनीवरुन अनेक वाद झाले आहेत. मागच्यावर्षी 'मस्तीझादे' चित्रपटातील एका दृश्यामध्ये धार्मिक भावना दुखावल्या म्हणून सनी लिऑन विरोधात दिल्लीच्या आदर्श नगर पोलिस स्थानकात एफआयआर दाखल झाला होता. त्यावेळी सनीसोबत तिचे सहकलाकार वीर दास, तृषार कपूर आणि दिग्दर्शक मिलाप झवेरी यांच्या नावाचा सुद्धा एफआयआरमध्ये समावेश करण्यात आला होता.
सनी लिओनी विरोधात दाखल झाला होता १०० कोटींचा अब्रु नुकसानीचा खटलाबिग बॉस सीझन पाचमधील स्पर्धक आणि मॉडेल पूजा मिश्राने अभिनेत्री सनी लिऑन विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यामध्ये पूजाने सनीवर बदनामी केल्याचा आरोप करत तिच्याकडून नुकसानभरपाईपोटी १०० कोटी रुपये मागितले होते.