नवी दिल्ली - भारतात 44 वर्षापूर्वी म्हणजे 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती. आजच्या या आणीबाणी घटनेला प्रत्येक जण आपल्यापरिने ट्विट करत भाष्य करत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आणीबाणीच्या या घटनेवर ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून ममता यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, आजच्या दिवशी देशात आणीबाणी घोषित केली होती मात्र मागील 5 वर्षात देशात सूपर इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. आपल्याला इतिहासाकडून खूप काही शिकणे गरजेचे आहे. लोकशाहीच्या संस्थांनांचे रक्षण करण्यासाठी लढण्याची इच्छा हवी असं ममतांनी सा्ंगितले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात तणाव वाढलेला आहे. ममता बॅनर्जी यांनी उघडपणे आक्रमक पवित्रा घेत मोदी सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यालाही ममता बॅनर्जी यांनी गैरहजेरी लावली. पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये दररोज हिंसक कृत्य होताना पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन हिंसा करत आहेत. अनेक कार्यकर्त्यांची हत्याही झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी उत्तर परगना जिल्ह्यातील आमडांगामध्ये दोघांची हत्या करण्यात आली आहे. मृतांचे नाव नजीमुल करीम उर्फ अकबर अली मंडल (23) आणि गोपाल पाल (50) असे आहे. नजीमुल आमडांगामधील बईचगाछीचा राहणारा आहे. तर गोपाळ हे बेडुग्रामचे रहिवासी आहेत. भाजपाने हे दोघेही पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला आहे. तसेच तृणमूल काँग्रेसवर हत्येचा आरोप केला आहे. या आरोपांचे तृणमूल काँग्रेसने खंडन केले असून पोलिसांनुसार नजीमुलचा मृत्यू दारुड्यांनी केलेल्या मारहाणीत झाला आहे. तर गोपाळची हत्या व्यवहारातील वैमनस्यातून झाली आहे.
तर ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना मोहन भागवत म्हणाले होते की, निवडणूक संपली की स्पर्धा संपली, निवडून येणारे सर्व पक्षीय आता मिळून देशाचे काम करणे आवश्यक असते. पण पश्चिम बंगालमध्ये काय सुरू आहे. एक हार सहन होत नाही ही चांगली बाब नाही. एकीकडे देश तोडणाऱ्यांविरुद्ध लढत असल्याचा देखावा करायचा आणि दुसरीकडे समाजसमाजाला लढून आपली राजकीय पोळी शेकायची हे चांगले नाही, अशा शब्दात सरसंघचालकांनी ममता बॅनर्जी यांचे कान टोचले होते.