मुंबई : तिसरी वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस सेवा सुरू होऊन अवघ्या दोन महिन्यांतच प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाली आहे. गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणारी तिसरी वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसने नोव्हेंबरमध्ये ९.२ कोटी रुपये कमावले आहेत.
नोव्हेंबरमध्ये मुंबई ते गांधीनगर या ट्रेनने ४.४९ कोटी रुपये कमावले, तर गांधीनगर ते मुंबई या ट्रेनने केवळ तिकीट भाड्यांद्वारे ४.७२ कोटी रुपये कमावले आहेत. ऑक्टोबर महिन्यात तिकीट विक्रीतुन ८.२५ कोटी उत्पन्न मिळाले होते. ३० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारतला झेंडा दाखविला होता. या गाडीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, सरासरी १३० टक्के क्षमतेने गाडी धावत आहे, असे पश्चिम रेल्वेने सांगितले.
- १६ डब्यांच्या वंदे भारत ट्रेनमध्ये ११२८ प्रवासी बसण्याची क्षमता आहे. गांधीनगर ते मुंबई या वंदे भारत एक्स्प्रेसचा एकेरी प्रवासाचा वेळ अंदाजे साडेपाच तासांचा आहे.
- मुंबई ते गांधीनगर एसी चेअर कारमध्ये प्रवास करण्यासाठी १२७५ रुपये आणि गांधीनगर ते मुंबई प्रवासासाठी १४४० रुपये मोजावे लागतात.
मुंबई ते अहमदाबाद इतर गाड्यांवर परिणाम नाहीवंदे भारतच्या लोकप्रियतेचा शताब्दी एक्स्प्रेससारख्या मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या इतर गाड्यांवर परिणाम झाला नाही. खरेतर, नवीन वंदे भारत ट्रेन या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मागणीला पूरक आहे, तर शताब्दी एक्स्प्रेसदेखील सरासरी प्रवासी संख्येने धावत आहे, असे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.