बल्लारी( कर्नाटक) : राजीनाम्यावर आपण ठाम असून, तो मागे घेणार नाही, असे येथील पोलीस उपअधीक्षिका शेणॉय यांनी स्पष्ट केले आहे. कर्नाटकचे मंत्री पी. टी. परमेश्वर नाईक यांच्याशी झालेल्या वादानंतर फेसबुकवर टीका केल्यामुळे अनुपमा वादात अडकल्या होत्या. राजीनामा देऊन अज्ञातवासात गेल्यानंतर त्यांनी कुणाशीही संपर्क ठेवला नव्हता. शेणॉय यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले होते.बल्लारी जिल्ह्याच्या कुडलगी उपविभागात त्या कार्यरत होत्या. दारू दुकानाच्या विस्ताराला विरोध करणाऱ्या दलित संघटनांची बाजू घेत, त्यांनी कारवाई केल्यामुळे राजकीय दबाव वाढला असतानाच, त्यांनी ४ जून रोजी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. जानेवारीमध्ये त्यांची बदली करण्यात आली होती. नाईक यांचे कॉल होल्डवर ठेवत असल्याच्या कारणावरून त्यांनीच बदलीचा दणका दिल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. नाईक यांनी त्याबाबत केलेल्या दाव्याचे व्हिडीओ फुटेज व्हायरल झाल्यामुळे वादात भरच पडली होती. मंत्री कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप अनुपमा शेणॉय यांनी केला होता. (वृत्तसंस्था) >पत्रकारांसमक्ष मांडली भूमिका...अनुपमा शेणॉय यांनी राजीनामा दिल्यानंतर अज्ञातवासात राहून फेसबुकवर प्रतिक्रिया देणे चालविल्यामुळे तर्कवितर्कांत भर पडली होती. गुरुवारी कुडलगी येथे पत्रकारांसमक्ष हजर होत, त्यांनी राजीनाम्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. फेसबुकवर टाकण्यात आलेल्या पोस्टबद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या की, ‘माझ्या नावावर कुणीतरी त्याचा वापर करीत असावे. ते हॅक केले असण्याचीही शक्यता आहे.’
कर्नाटकच्या ‘त्या’ पोलीस अधीक्षिका राजीनाम्यावर ठाम
By admin | Published: June 10, 2016 4:10 AM