ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - कोट्यावधींचे मानधन घेणा-या स्टार सेलिब्रिटींच्या खासगी ड्रायव्हर, मेक अप आर्टीस्ट आणि स्पॉट बॉयला एका चार्टड अकाऊंटपेक्षाही जास्त पगार द्यावा लागतो असा दावा दिग्दर्शक मुकेश भट यांनी केला आहे. सेलिब्रिटींच्या खासगी स्टाफच्या या मनमानीवर मुकेश भट यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दिग्दर्शक मुकेश भट यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्टार सेलिब्रिटींच्या स्टाफवर होणा-या उधळपट्टीचा लेखोजोखाच मांडला. सेलिब्रिटींच्या स्टाफवरील हा खर्च अनावश्यक असून यामुळे चित्रपटाचा बजेट वाढतो पण चित्रपटाचा दर्जा मात्र वाढत नाही अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. स्टार कलाकारांच्या स्टाफवर होणा-या उधळपट्टीविरोधात सर्व निर्मात्यांनी एकत्र येऊन या खर्चाला कात्री लावावी असे मत त्यांनी मांडले. चित्रपटात दोन मोठे स्टार असतील तर त्यांच्या खासगी स्टाफवर सुमारे दोन कोटी रुपये खर्च होतात असे भट यांचे म्हणणे आहे. सीएपेक्षा सेलिब्रिटीच्या ड्रायव्हर आणि स्पॉट बॉयला आम्ही जास्त पैसे देतो ही बाब दुर्दैवी आहे असे त्यांनी सांगितले.
एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी ७० दिवस लागतात. तर २० ते २५ दिवस चित्रपटाच्या डबिंग आणि प्रोमोशमध्ये जातात असे भट यांनी म्हटले आहे. मुकेश भट यांनी मांडलेले गणित खालील प्रमाणे,
> स्टार कलाकारांच्या मेक अप मॅन आणि हेअर स्टायलिस्टचे प्रति दिवसाचे मानधन - प्रति दिवस सुमारे १ लाख रुपये
> कलाकाराचा ड्रायव्हर - प्रति दिवस ५ हजार रुपये
> कलाकारासोबतचा स्पॉट बॉय - प्रति दिवस ५ हजार रुपये
> वेशभूषा सहाय्यक (शूटिंगदरम्यान कलाकारासोबत त्याचे कपडे घेऊन फिरणारा मुलगा) - प्रति दिवस ५ हजार रुपये
> कलाकाराचा मदतनीस (शूटिंग दरम्यान कलाकाराचा फोन व अन्य महत्त्वाच्या सामानाची देखभाल करणारा व्यक्ती) - दिवसाला ५ हजार रुपये
> डबल डोअर व्हॅनिटी व्हॅनसाठी २० हजार रुपये प्रति दिवस
> प्रोमोशन दरम्यान स्टार कलाकार एकाच दिवशी पाच ठिकाणी गेल्यास त्याचा मेक अपमॅन, हेअर स्टायलिस्ट व ड्रायव्हर पाच पट पैसे घेतात. यानुसार ड्रायव्हरला प्रति दिवस २५ हजार रुपये मिळतात.
> निर्मात्याला सिनेमासाठी लावलेला पैसा वसूल करण्यासाठी एकूण बजेटच्या दुप्पट कमाई होणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ एका सिनेमासाठी समजा २ कोटी रुपये खर्च झाले व सिनेमाने ४ कोटी रुपयांची कमाई करणे गरजेचे आहे. ४ कोटींच्या पुढे मिळणारे उत्पन्न हा त्या निर्मार्त्यासाठी नफा ठरतो.