नवी दिल्ली, दि. 26 -चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे (CBFC) अध्यक्ष पहलाज निहलानी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. निहलानी यांनी आता सिनेमातील दारू आणि सिगारेटच्या चित्रिकरणाविरोधात पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ‘द क्विंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, या निर्णयाबाबत निहलानी यांनी सांगितले आहे की ''दारू किंवा सिगारेट पिण्याच्या दुष्परिणामांची सूचना स्क्रीनच्या एका कोप-यात जारी करणं पुरेसं नाही. आम्हाला असे वाटते की ज्या सुपरस्टार्संचं कोट्यवधी लोकं अनुसरण करतात आणि जे समाजात एक उदाहरण निर्माण करतात त्यांना ऑनस्क्रीन दारू किंवा सिगारेट पिताना दाखवले गेले नाही पाहिजे''. ज्या सिनेमात दारूसंदर्भातील दृश्य आवश्यक आहेत, त्या सिनेमांना ए सर्टिफिकेट दिले जाईल, असेही ते म्हणालेत.
यापूर्वी पहलाज निहलानी यांनी ''लिपस्टिक अंडर माय बुर्खा'' या सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. त्यानंतर शाहरूख खान व अनुष्का शर्माचा आगामी सिनेमा ''जब हॅरी मेट सेजल'' सिनेमातील इंटरकोर्स या शब्दावर आक्षेप घेतला होता व हा शब्द सिनेमातून वगळण्यात यावा, असे म्हटले होते. अमर्त्य सेन यांची डॉक्युमेंट्री ''द आर्ग्युमेंटेटीव्ह इंडियन से गुजरात'' मधील गाय या शब्दाला हटवण्याची मागणी निहलानी यांनी केली होती. आता त्यांना दारू व सिगारेट संदर्भातील चित्रिकरणावरुन समस्या आहे.
CBFCचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांची खुर्ची जाणार ?दरम्यान, CBFCचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांची खुर्ची धोक्यात असल्याचे वृत्त समोर आले आहे. एका सरकारी सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अनेक वादांमध्ये अडकलेले निहलानी यांना लवकरच नारळ देऊन पदावरुन हटवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 28 जुलैला निहलानी यांनी तिरुअनंतपुरम येथे CBFC तील सदस्यांची बैठक बोलावली आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयातील सूत्रांनुसार, खुर्ची जाणार असल्याची संकेत निहलानी यांना मिळाले आहेत.
दरम्यान, निहलानी यांच्याकडून यासंदर्भात अद्यापपर्यंत कोणतेही स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत. तर, निहलानी यांच्या जागी सिनेनिर्माता प्रकाश झा किंवा टीव्ही प्रोड्युसर व अभिनेता चंद्रप्रकाश द्विवेदी यांची नियुक्ती होऊ शकते. शिवाय सध्या ''इंदू सरकार'' सिनेमाच्या वादामुळे चर्चेत असलेले निर्माते मधुर भांडारकर यांचंही नाव यादीत असल्याचे बोलले जात आहे.
कोण आहेत पहलाजी निहलानी?हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्माता म्हणून पहलाज निहलानी ओळखले जातात. ९० च्या दशकात त्यांनी गोविंदाबरोबर ‘आँखे’, ‘शोला और शबनम’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली. इंडस्ट्रीत चित्रपट निर्मात्यांशी संबंधित गिल्ड आणि इंपा या संस्थांचेही त्यांनी नेतृत्व केले होते.चित्रपटसृष्टीशी निगडीत समस्यांवर नेहमीच आवाज उठवून सरकारी स्तरावर त्याचा पाठपुरावा करण्यासाठी नेहमीच ते तत्पर असल्याचे इंडस्ट्रीत मानले जाते. पहलाज निहलानी हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी यांचे बंधू आहेत.