नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) दमोह जिल्ह्यात अंधश्रद्धेचा कहर पाहायला मिळत आहे. पावसासाठी मुलींना निर्वस्त्र करून गावभर फिरवलं जात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बराच कमी पाऊस (Rain) झाला आहे. शेतातील पिकंही डोळ्यादेखत खराब होत आहेत. अशावेळी गावकऱ्यांनी जिल्ह्यात चांगला पाऊस व्हावा यासाठी परंपरेनुसार चालत आलेल्या काही प्रथा सुरू केल्या आहेत. अनेक ठिकाणी पाऊस चांगला पडावा म्हणून विविध गोष्टी देखील केल्या जातात. चित्र-विचित्र प्रकार केले जातात.
दमोह गावातील महिलांनी लहान मुलींना निर्वस्त्र करून गावातून फिरवलं आहे. ग्रामीण भागातील लोकांचा असा समज आहे, की लहान मुलींना निर्वस्त्र करून गावातून फिरवल्यास पाऊस येतो. याच अंधश्रद्धेतून त्यांनी असं केलं. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दमोह जिल्ह्यातील जबेरा तहसीलच्या अंतर्गत येणाऱ्या बनिया गावातील आहे. शेतीतील पिकं सुकताना पाहिल्यावर गावातील महिला एकत्र आल्या. यानंतर त्यांनी बेडकाला दोरीनं बांधत उलटं टांगलं आणि मग गावातील काही लहान मुलींचे कपडे काढले. यानंतर या मुलींना निर्वस्त्र करून गावभर फिरवलं.
गावातील महिलांना जेव्हा या अंधश्रद्धेबद्दल या विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी असं का केलं ते सांगितलं. असं केल्यावर चांगला पाऊस पडतो असं म्हटलं आहे. या प्रकरणी दमोहचे पोलीस अधीक्षक डीआर तेनिवार यांनी संबंधित प्रकरणाचा तपास केला जात आहे. रिपोर्ट येताच कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने या प्रकरणी दमोहच्या कलेक्टरला नोटीस पाठवली आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली लहान मुलींसोबत केल्या जाणाऱ्या प्रकारावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.