ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 7 - सोमवारी जेव्हा संपुर्ण देशाचं लक्ष GSLV मार्क -3 च्या प्रक्षेपणाकडे लागलं होतं, तेव्हा हैदराबादमध्ये राष्ट्रीय महामार्ग 163 वर जमिनीखाली शिवलिंगचा शोध घेण्यासाठी खोदकाम सुरु होतं. खोदकाम करण्यासाठी जेएसबी मशीनही मागवण्यात आल्या होत्या. धक्कादायक म्हणजे हे खोदकाम करण्यासाठी स्थानिकांपासून ते नेत्यांपर्यंत सगळ्यांनी समर्थन दिलं होतं. बरं हा सगळा व्याप फक्त एका व्यक्तीच्या सांगण्यावरुन सुरु होता ज्याने स्वप्नात याठिकाणी शिवलिंग पाहिल्याचा दावा केला होता.
ही घटना हैदराबादपासून 80 किलोमीटर दूर असलेल्या तेलंगणामधील जनगावातील आहे. या खोदकामामुळे राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. हा हायवे वारंगलला हैदराबादशी जोडतो. याच महामार्गावर मधोमध आठ फूट खोल खड्डा खोदण्यात आला.
Man digs NH 163 connecting Hyderabad & Warangal, in search of Shiva Lingam, claims to have been visited by Lord Shiva in his dreams. pic.twitter.com/geSTr0ewH4— ANI (@ANI_news) June 7, 2017
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज नावाची ही व्यक्ती गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी खोदकाम करण्यासाठी जोर देत होता. त्याने आपल्या स्वप्नात शिवलिंग पाहिलं होतं. जेव्हा कधी याठिकाणी तो यायचा तेव्हा जोरात हालचाल करायला आणि लोटांगण घालायला सुरुवात करायचा.
गेल्या तीन वर्षांपासून मनोज शिवरात्रीच्या मुहूर्तावर खोदकाम करावं यासाठी तो मागे लागला होता. सुरुवातीला कोणीही त्याला गंभीरतने घेतलं नाही. प्रत्येक सोमवारी हायवेच्या शेजारी बसून तो पूजा करत असेल. शेवटी गावकरी, स्थानिक नेता आणि सरपंच यांनी होकार दर्शवला आणि खोदकाम करण्यासाठी जेसेबी मागवल्या. खोदकाम करुनही शिवलिंग काय अद्याप सापडलेलं नाही.
सुरुवातीला मनोजने 10 फूट खोदण्यास सांगितलं, पण 15 फूट खोदूनही शिवलिंग सापडलं नाही. तेव्हा एका स्थानिक पोलीस कर्मचा-याला संशय आला आणि त्याने मनोजसह एका स्थानिक नेत्याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी बेकायदेशीरपणे खोदकाम केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र एफआयरमध्ये कोणाचंही नाव नाही आहे.