भोपाळ - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट होत आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. याच दरम्यान मध्य प्रदेशातील एका तरुणाने थेट आपल्या लग्नपत्रिकेच्या माध्यमातून सीएएला पाठिंबा दर्शवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर जिल्ह्यातील एका तरुणाने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी आपल्या लग्नपत्रिकेवरच पाठिंबा दर्शवला आहे. प्रभात असं या तरुणाचं नाव असून त्याने लग्नपत्रिकेवर I Support CAA असा मजकूर लिहिला आहे. शनिवारी (18 जानेवारी) प्रभातचा विवाह संपन्न झाला. 'नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत जनजागृती व्हावी. या कायद्यासंबंधीत सर्व गोष्टी लोकांना समजाव्यात यासाठी सीएएला पाठिंबा देत आहे. त्यामुळे लग्नपत्रिकेवर I Support CAA असा मजकूर लिहिण्याचा निर्णय घेतला' अशी माहिती प्रभातने दिली आहे.
उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यातील एका कुटुंबानेदेखील लग्नात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठिंबा दिला आहे. लग्नपत्रिकेवर We support CAA and NRC असं मोठ्या अक्षरात छापण्यात आले आहे. मोहीत मिश्रा आणि सोनम पाठक यांचा विवाह 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यांनी लग्नपत्रिकेत सीएए आणि एनआरसीला पाठिंबा दर्शवला आहे. या लग्नपत्रिका सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.
केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते प्रताप सारंगी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. प्रताप सारंगी यांनी शनिवारी (18 जानेवारी) काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या लोकांना भारताची अखंडता आणि वंदे मातरम मान्य नाही. त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही असं सारंगी यांनी म्हटलं आहे. तसेच देशाच्या विभाजनाच्या पापाचं प्रायश्चित म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती कायदा असल्याचं म्हटलं आहे. गुजरातमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
'देशाच्या विभाजनाचं पाप तर काँग्रेसने केलं होतं मात्र त्याचं प्रायश्चित तर आम्ही करत आहे. त्यामुळेच यासाठी काँग्रेसने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचं स्वागत केलं पाहीजे' असं भाजपाच्या प्रताप सारंगी यांनी म्हटलं आहे. तसेच 'या कायद्याला विरोध का केला जात आहे? कारण त्याचं अस्तित्व संपुष्टात येत आहे. त्यामुळेच ते देशामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोक अशापद्धतीचं काम करतात त्यांना देशप्रेमी मानलं जात नाही. ज्यांना भारताचं स्वातंत्र्य, अखंडता आणि वंदे मातरम मान्य नाही त्यांना या देशामध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नाही' असं देखील सारंगी यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
24 जानेवारीला महाराष्ट्र बंद; आंबेडकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
Delhi Election: काँग्रेसमध्ये घराणेशाही, पक्षातील नेत्यांच्या डझनभर मुला-मुलींना उमेदवारी
प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा कोकणकड्यावरून पडून मृत्यू
India Vs Australia Live Score: ऑस्ट्रेलियाचे शतक, स्मिथ-लाबुशेनची अर्धशतकी भागीदारी