आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर आणि संधी मिळेल तिकडे उडी मारण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. सर्वच राजकीय पक्षात प्रवेश अन् पक्षाला सोडचिठ्ठी देण्यात येत आहे. देशातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपात गेल्या काही दिवसांत प्रवेश करणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली असून जणू भाजपात प्रवेशासाठी रांगच लागल्याचं दिसून येत आहे. महाराष्ट्रातही बड्या काँग्रेस नेत्यांनी भाजपात प्रवेश करुन आपली कमळ हाती घेतलं आहे. तर, काँग्रेसमध्येही पक्षप्रवेश होत आहेत. नुकतेच युपीतील खासदाराने नवी दिल्ली येथे जाऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
झारखंडमधील आमदार प्रकाश भाई पटेल यांनी आजच भाजपाला रामराम ठोकत काँग्रेसचा हात हाती घेतला. त्यानंतर, आता उत्तर प्रदेशमधील मायावतींच्या पक्षातील खासदार दानिश अली यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. बहुजन समाज पक्षाने गतवर्षी डिसेंबर महिन्यात दानिश अली यांच्यावर पक्षविरोधी कार्यवाही केल्याने त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर, ऐन निवडणुकांच्या तोंडावर अली यांना काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दानिश अली हे अमरोहा मतदारसंघातून खासदार आहेत.
आगामी निवडणुकांसाठी भाजपाने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे, या दोन्ही राज्यातील घडामोडींकडे देशाचे लक्ष लागले आहे. त्यातच, उत्तर प्रदेशात मायावती यांचा पक्ष भाजपासोबत एनडीएमध्ये येणार असल्याची चर्चा होती. मात्र, मायावतींनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे. त्यातच, त्यांच्या बहुजन समाज पक्षाचे खासदार दानिश अली यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने हा मायावती यांच्या पक्षाला मोठा धक्का मानला जातो. कारण, ते पक्षातील महत्त्वाचा चेहरा मानले जात होते.
दरम्यान, आज काँग्रेस मीडिया प्रमुख पवन खेडा यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी बसपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता, काँग्रेसच्या तिकीटावर ते लोकसभा निवडणूक लढवतील, असे चित्र स्पष्ट झाले आहे.