नवी दिल्ली - कोरोनाने संपूर्ण जगात दहशत निर्माण केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या १४ तासांच्या जनता कर्फ्यूचे काउंटडाऊन काही तासांतच सुरू होईल. हा कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी सर्वस्थरांतून प्रतिसाद मिळत आहे. रेल्वेने रविवारी देशभरातील जवळपास 3,700 रेल्वेगाड्या रद्द केल्यानंतर आता देशातील इंडिगो आणि गोएअर या मोठ्या कंपन्यांनीही जवळपास 1 हजार उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नावे केलेल्या भाषणात रविवारी, 22 मार्चला जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यांनी रविवार सकाळी 7 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत नागरिकांनी घरातच राहावे, असे आवाहन केले आहे. कोरोनामुळे देशावर लॉकडाउनची वेळ आली, तर देश कितपत तयार आहे, हेही या माध्यमातून कळेल.
विमानांची जवळपास 1,000 उड्डाणे रद्द -पंतप्रधानांच्या आवाहनानंतर रेल्वे विभागाने गाड्या रद्द करण्याची घोषणा केली. यानंतर आता इंडिगो आणि गोएअर या दोन विमान कंपन्याही कर्फ्यूच्या समर्थनार्थ समोर आल्या आहेत. एकिकडे गोएअरने रविवारी आपली देशातील सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. तर दुसरीकडे इंडिगोने केवळ 60% उड्डाणे करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांची मिळून अंदाजे १००० उड्डाणे रद्द झाली आहेत. मात्र, या कंपन्यांनी रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांच्या तिकिटाचे पैसे वापस करण्यासंदर्भात कसलेही भाष्य केलेले नाही.
गोएयरने म्हटले आहे, की ते रविवारी सर्व स्थानिक उड्डाणे रद्द करणार आहेत, कंपनीने सांगितल्याप्रमाणे दर रविवारी त्यांची 330 उड्डाणे होत असतात. तर, देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोने म्हटले आहे, की ते 60% उड्डाणे करतील. कंपनीने म्हटले आहे, की रविवारी त्यांचे साधारण पणे 1,400 उड्डाणे होतात.
३७०० रेल्वेगाड्या रद्द -रेल्वेने केलेल्या घोषणेनुसार, रविवारी रद्द करण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये २४०० पॅसेंजर तर, १३०० लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. रविवारी पहाटे ४ ते रात्री १० या काळात या रेल्वे बंद राहणार आहेत. रेल्वेच्या सर्व विभागांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईत रविवारी लोकलचे वेगळे वेळापत्रक असते. तसेच मेगाब्लॉकच्या काळात काही सेवा रद्द केल्या जातात. त्यानंतरही अनेक लोकल रद्द करण्याची तयारी रेल्वेने केली आहे. मध्य रेल्वेकडून मुख्य, हार्बर, ट्रान्सहार्बर मार्गावरील आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलच्या किती फेऱ्या रद्द होतील, याची माहिती शनिवारी जाहीर केली जाईल. आयआरसीटीसीनेही फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम, जनआहार, सेल किचन या सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
परप्रांतीय माघारीखासगी कार्यालये पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी देताच वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या परप्रांतीयांनी आपापल्या राज्यांत माघारी जाण्यास सुरुवात केली. चाकरमानीही गावाकडे निघाले. त्यामुळे गेले चार दिवस कमी गर्दी असलेल्या मेल-एक्स्प्रेसच्या तिकिटांसाठी रांगा लागल्याचे दिसून आले.