नवी दिल्ली : मतदार याद्यांना आधार जोडण्याच्या निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला कायदा मंत्रालय अंतिम स्वरूप देत आहे. यामुळे मतदार याद्यांतील डुप्लिकेट नोंदींवर तोडगा निघेल आणि स्थलांतरित मतदारांना आपला मताधिकार मिळेल. याबाबत मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त सुशील चंद्र व अशोक लवासा यांच्याशी चर्चा केली.
निवडणूक सुधारणांबाबतच्या प्रलंबित ४० प्रस्तावांवर विचार करण्याची गरज यावेळी सुनील अरोरा यांनी व्यक्त केली. या प्रस्तावानुसार, मतदार यादीला आधारचा १२ आकडी नंबर लिंक असेल. याबाबत कायदा मंत्रालयाच्या सचिवांनी अनुकूल मत व्यक्त केले आहे, तसेच निवडणूक आयोगाला आश्वासन दिले आहे की, याबाबत दोन कायद्यांत बदल करण्यासाठी एक कॅबिनेट नोट तयार करण्यात येईल. ज्या कायद्यात बदल करावा लागणार आहे त्यात ‘रिप्रेझेंटेशन आॅफ पीपल्स अॅक्ट’ आणि ‘आधार लॉ’ यांचा समावेश आहे. नोकरी आणि इतर कामानिमित्त अनेक मतदार त्यांच्या मतदारसंघाच्या बाहेर राहतात. सैन्यातील जवानाची पत्नी सध्या सर्व्हिस वोटर म्हणून मतदान करू शकते. मात्र, महिला सैन्य अधिकाºयाचा पती असे करू शकत नाही. नव्या प्रस्तावित विधेयकात या दोघांनाही असा अधिकार देण्याबाबत विचार आहे.