ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - आंतरजातीय विवाहाबाबत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे. संघाचं मुखपत्र ऑर्गनायझरला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आंतरजातील विवाहाचे समर्थन केले आहे.
स्वंयसेवकांनी अशा सुधारात्मक उपायांच्या बाजूने उभं राहिले पाहिजे, यावर आम्ही जोर देत असतो. सामान्यपणे असं होत असतं आणि असं झालं ही पाहिजे असं भागवत म्हणाले आहेत. एका सर्व्हेक्षणानुसार आंतरजातीय विवाह करणाऱ्यांमध्ये स्वयंसेवकांची संख्या अधिक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विशेष म्हणजे भाजपाने ‘ब्राह्मण-बनिया’ (व्यापारी) या धोरणाचा त्याग करत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मागासवर्गीय जाती आणि दलितांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आणि यात त्यांना मोठं यश मिळालं. सामाजिक समानतेचे जेथे जेथे समर्थन करणारे लोक सत्तेवर आहेत. अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातींच्या कायदेशीर तरतुदी त्यांनी सक्तपणे लागू केले पाहिजे. सरकारचा पैसा वेळेवर आणि योग्य कामासाठी देण्यासाठी योग्य व्यक्तीची नियुक्ती केली तर हे एक मोठे काम असू शकते. यामुळे 50 टक्के प्रणालीनुसार काम केल्यास सर्व प्रश्न सुटतील, असे ते म्हणाले.
अशा तरतुदी पूर्वीपासून आहेत. फक्त त्या योग्य भावनेने लागू करण्याची आवश्यकता आहे. सरकार संस्थांमध्ये सर्वोच्च पदावर असलेल्या स्वयंसेवकांनी या पैलूकडे लक्ष केंद्रीत केले, पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.
विशेष म्हणजे सध्या केंद्र आणि अनेक राज्यातील भाजपा सरकारच्या वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले नेते हे संघाच्या पार्श्वभूमीचे आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून महाराष्ट्र, हरियाणा, मध्य प्रदेश उत्तराखंडचे मुख्यमंत्री तेकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींचाही समावेश होतो.